० सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी ‘जेईई’चा अभ्यास करताना लक्षात ठेवावं की, बारावी बोर्ड आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची अभ्यास पद्धती आणि ‘जेईई’ची अभ्यासपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. ‘जेईई’च्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी, बारावीच्या एकत्रित अभ्यासक्रमातून तयार झाला आहे. जेईई परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असून संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
० दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना घोकंपट्टी करण्यापेक्षा पदार्थविज्ञानशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर द्यावा.
० मात्र, केवळ संकल्पना समजून घेणे पुरेसे नाही. तर जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने प्रश्न सोडवण्याची उच्च क्षमता स्वत:मध्ये विकसित करायला हवी. ‘जेईई’मध्ये विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारण पुस्तकांमधल्या प्रश्नांसारखे नसतात. या परीक्षेत मूळ (ओरिजिनल) प्रश्न विचारले जातात. म्हणूनच समस्या सोडवण्याची पद्धत विकसित करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा विद्यार्थ्यांनी सराव करावा. यामुळे विद्यार्थी शिकण्याच्या नवीन पद्धती शिकू शकतील.
० प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित झाली की, विद्यार्थ्यांनी वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. यामुळे वेळेचे बंधन पाळण्याच्या तणावात प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांना होतो. पेपर सोडविण्याच्या क्लृप्त्या आणि मुत्सद्दीपणा आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतो.
० जेईईच्या परीक्षार्थीनी आयआयटी-जेईईच्या गेल्या ३० वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा, त्यातील प्रत्येक प्रकरणाचा कसून अभ्यास करावा. कारण जेईई मुख्य परीक्षेत आयआयटीच्या बहुतांश प्रश्नांची सुधारित आवृत्ती अपेक्षित असते.
० जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, गणित, पदार्थविज्ञानशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांचा परस्परांशी खूप जवळचा संबंध (इंटर-रिलेटेड) आहे. यामुळे या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी या तिन्ही विषयांचा स्वतंत्रपणे नव्हे तर या एकात्मिक संपूर्ण विषयाच्या- वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करत आहोत, ही भावना ठेवावी.
० काही विषयांचा समन्वय साधत अभ्यास करणे आवश्यक ठरते. गणितात कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि कॅल्क्युलस, पदार्थविज्ञानशास्त्रात मॅकॅनिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, फिजिकल केमेस्ट्रीमध्ये केमिकल कायनेटिक्स, इक्विलीब्रिया आणि थर्मोकेमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिअॅक्शन मेकॅनिझम आणि इनआरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये बॉण्डिंग आणि को-ऑर्डिनेशन कंपाऊंड्स या मुद्दय़ांचा समन्वय साधत अभ्यास करणे आवश्यक आहे.
० ‘JEE’ च्या परीक्षार्थीनी गणित, पदार्थविज्ञानशास्त्र आणि रसायनशास्त्रात वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये ‘कॅल्क्युलस टेक्निक्स’ वापरण्याची कला अवगत करावी. ‘जेईई’तील खूप सारे कठीण प्रश्न हे कॅल्क्युलस तंत्रावर आधारित असतात आणि हे तंत्र साध्य होणे परीक्षार्थीसाठी उपयुक्त ठरते.
० ‘JEE' ची तयारी करणारे देशभरातील सर्वाधिक विद्यार्थी रसायनशास्त्राचा अभ्यास अयोग्य पद्धतीने केल्याने परीक्षेत मार खातात. हे लक्षात घेत ऑरगॅनिक किंवा इनऑरगॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करण्याआधी विद्यार्थ्यांनी अॅटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉण्डिंग, पिरिऑडिक टेबल मोल कॉन्सेप्ट आणि रिडॉक्स कॉन्सेप्ट या संकल्पनांचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास पदार्थविज्ञानशास्त्र आणि गणिताच्या संकल्पनांचा उपयोग करीत करावा. जर विद्यार्थ्यांना शंभर टक्के फिजिकल केमिस्ट्री आणि ७० टक्के ऑरगॅॅनिक केमिस्ट्री आणि ३० टक्के इनऑरगॅनिक केमिस्ट्रीतील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना उमजल्या तर विद्यार्थ्यांना जास्त घोकंपट्टी करावी लागणार नाही. यासोबतच JEE विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे की, रसायनशास्त्र हा जास्त गुण मिळवून देणारा विषय असून यालासुद्धा गणित आणि पदार्थविज्ञानशास्त्राइतकेच महत्त्व आहे. म्हणूनच रसायनशास्त्राचा पुरेसा आणि योग्य पद्धतीने अभ्यास करावा.
० जेव्हा विद्यार्थी JEE चाचण्या परीक्षा देतील, तेव्हा विद्यार्थ्यांनी सुरुवातीला रसायनशास्त्र, त्यानंतर पदार्थविज्ञानशास्त्र आणि अंतिमत: गणित अशा क्रमाने प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. यामुळे अधिकाधिक प्रश्न अचूकपणे सोडविण्यास मदत होते.
० ‘JEE' च्या परीक्षार्थीनी हे लक्षात ठेवायला हवे की, JEE अभ्यासक्रमाच्या सर्वच्यासर्व म्हणजे- ११० प्रकरणांत आपण तरबेज होणं शक्य नाही. मात्र, त्याऐवजी (७) मध्ये नमूद केलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करा. मुख्य परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांला ८५ टक्के अभ्यासक्रमावरील प्रश्न अचूक सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा.