करोना लॉकडाऊन आणि शरद पवार एक अनमोल विचार विविध स्थारांवर केलेलं मार्गदर्शन


महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भात जनतेला घरी थांबण्याचे आवाहन केले त्यास एक आठवडा पूर्ण झाला आहे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला संबोधित केले व मार्गदर्शन केले तो कालावधी धरला तर तीन आठवड्याचा कालावधी होतो. त्यामुळे आता आपल्याला आणखी दोन आठवडे सूचना पाळायच्या आहेत.
सरकारने आपल्याला जो सल्ला दिला आहे, जे काही मार्गदर्शन केले आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. संकट मोठं आहे आणि आता जी माहिती मिळते, परिस्थिती दिसते, आकडेवारी दिसत आहे त्यातून कोरोना पेशंटची संख्या, लागण झालेल्यांचा आकडा वाढतोय असं दिसतंय.
जमेची गोष्ट एकच आहे की लागण झालेल्या व्यक्तींना रूग्णालयातील उपचारांनंतर हे नागरिक बरे झालेलेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु कोरोनाचे वाढते रुग्ण ही तसं म्हटलं तर चिंताजनक गोष्ट आहे. विशेषतः इटली, अमेरिका, स्पेन या पाश्चिमात्य देशांमध्ये आपण जी स्थिती बघतोय ती अतिशय भयावह आहे.
पण आपण त्या रस्त्याला जायचं नाही हा आपला निर्धार आहे. त्यामुळे ज्या सूचना आपल्याला वारंवार केल्या जात आहेत त्यांची अंमलबजावणी आपण उत्तम रीतीने करूया.
एक जमेची गोष्ट म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शित्रण मंत्री अमित देशमुख हे सर्वजण कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव, वीज अधिकारी आणि प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी आणि सहाय्यक स्टाफ, हे अहोरात्र कष्ट करत आहेत. लोकांना आधार देत आहेत, तसेच त्यांची काळजी घेत आहेत आणि म्हणून या सगळ्यांचे आपण मनापासून अभिनंदन केले पाहिजे.
पण एकंदर परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. इतर ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या काही लोक पाळताना दिसत नाहीत. रस्त्यावर काही लोक फिरत आहेत असे दिसते. पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रसंग येतोय. ही वेळ पोलिसांवर आपण नको आणूया.
आणखी दोन आठवडे आपण बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही, हा निर्धार करूया. मीसुद्धा या दिवसांत कोणाला भेटलेलो नाही, घराबाहेर अजिबात पडलेलो नाही, जो काही संपर्क साधला तो दूरध्वनीवरून किंवा आपल्याशी व्हीडिओच्या माध्यमातून साधलेला आहे.
सध्या काही खासगी दवाखाने वा हॉस्पिटल्स मध्ये ओपीडी मध्ये रूग्णाची तपासणी बंद केल्याचे माझ्या कानांवर आले. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलद्वारे आमचे अनेक सहकारी रात्रंदिवस लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक ठिकाणी डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी ओपीडी बंद केली किंवा रूग्णांना घ्यायचं बंद केलं हा विरोधाभास योग्य नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची जी प्रतिमा तिला धक्का बसेल असे कृपया वागू नये.
माझे या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आवाहन आहे की पुढील तीन आठवडे वैद्यकीय सेवा देण्याचे काम थांबवू नका, आपल्या दवाखान्याचे दरवाजे रूग्णांसाठी बंद करू नका. आज या सेवेची अत्यंत गरज आहे.
भाजीपाला आणि धान्याची दुकाने राज्यात सुरू आहेत, त्यांची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. मुंबई शहरामध्ये अनेक वर्षांपासून संजय शेटे हे सहकारी भांडारचे चेअरमन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी भांडारच्या जवळपास २५ शाखा मुंबई शहरात आहेत आणि या सर्व शाखा नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे, मालाची कमतरता अजिबात नाही. त्यामुळे नागरिकांना अशा सगळ्या संस्थांकडून मालाची खरेदी करताना साठेबाजी करण्याची गरज नाही. कारण मालाची उपलब्धता आपल्याकडे भरपूर आहे आणि जे जे यासाठी प्रयत्न करतात त्या सर्वांचे आपण अभिनंदन करूया.
घर चालवायचं म्हटल्यावर एलपीजी सिलेंडरचीही अत्यंत आवश्यकता असते. हे सिलेंडर घरोघरी पोहचवण्याचे काम या क्षेत्रातील लोक करत आहेत, त्यांचेदेखील अभिनंदन केले पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणारे सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.
यावेळी खरी गरज सोशल डिस्टन्स पाळण्याची आहे, ते आपण करूया. गर्दी टाळून परस्परांशी संपर्क साध्या. योग्य ती काळजी आपण दोन आठवडे घेतली पाहिजे वा आणखी काही दिवस खबरदारी घ्यावी लागल्यास करावी लागेल. आपण त्याची तयारी करूया.
यातून आपण काही शिकतोय का? हा प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटतंय की आपण काही शिकलो आणि जे अनुभव आपण घेतले ते आपल्याला इथून पुढच्या दैनंदिन जीवनात सुद्धा पाळावे लागतील. विशेषतः लाईफस्टाईल विषयक आपल्या काही सवयी आहेत त्यांच्यामध्ये बदल करण्याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल.
या आरोग्य विषयक संकटातून उद्या मोठे आर्थिक संकट सुद्धा उभे राहील. आज जवळपास सर्व व्यवसाय, कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार-उद्योग बंद आहेत. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठा होईल, यामध्ये काही वाद नाही आणि म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचा विचार केला पाहिजे.
येथून पुढचे काही दिवस, काही महिने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय काटकसरीने राहण्याच्या संबंधित विचार करावा लागेल. वायफळ खर्च देखील टाळावे लागतील. काटकसरीचे धोरण आपल्याला निश्चितपणे सांभाळावे लागेल, योग्य ती काळजी आपण सर्वांनी घेतली नाही तर उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचा प्रसंग येईल.
आर्थिक संकट अधिक गंभीर आहे आणि त्याचे दुष्परिणाम अनेक दृष्टीने होतील. विशेषतः रोजंदारीवर परिणाम होईल. बेरोजगारी वाढेल. जाणकारांनी सांगितले आहे की विकासदर अगदी दोन टक्केपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हीच स्थिती राहिली तर त्याचे दुष्परिणाम हे सहन करावे लागतील.
आता हातात असलेल्या वेळेचा उपयोग सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कसा करायचा याचा विचार करायला हवा. प्रत्येकाने वैयक्तिक कुटुंबांमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये कशी खबरदारी घ्यायची याचा विचारविनिमय हा आताच करून ठेवून तयारीला लागले पाहिजे.
सार्वजनिक क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक लोक आहेत, एनजीओ पुढे येत आहेत. तेदेखील अभिनंदनास पात्र आहेत. अनेक ठिकाणी संकटग्रस्त लोकांना, मजुरांना. हातावर पोट असलेल्यांना अन्न देण्याच्या, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न हे लोक करतात.
सध्या संकटाची व्याप्ती जास्त असल्याने अधिक लोकांना ही मदत करावी लागेल. त्याची तयारी आपण सर्वांनी केली पाहिजे. समाजातील जे दुर्लक्षित घटक असतील त्यांना अन्नधान्य, जेवण, आरोग्य विषयक मदत पोहचवली पाहिजे. ही मदत पोहचवताना खेड्यापाड्यात, वाड्या-वस्त्यांमध्ये काम करण्याचा प्रयत्न असला पाहिजे.
शहरांमध्ये आणि परिसरामध्ये आरोग्य शिबिरे घेण्याच्या दृष्टीने आतापासून तयारी केली पाहिजे. शहरांमध्ये गावातून आलेले काही विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मदत करणे आवश्यक आहे.
हे संकट आता संपणार आहे. आपण आजच्या स्थितीला तोंड देऊ, उद्याच्या स्थितीला तोंड देऊ आणि उद्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज उत्तम रीतीने तयारी करू आणि या संकटावर आपण मात करू. कोरोनावर आपण विजय मिळवणारच हा जो आपला निर्धार आहे त्यामध्ये तडजोड नाही.
धर्मराम भास्कर यांनी मला प्रश्न विचारला की नोकरीसाठी शहरात असणाऱ्या ज्यांच्याजवळ रेशनिंग कार्ड नाही त्यांना आधार कार्डवर धान्य मिळणार का?
मी अन्न व पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे यांच्याशी आत्ताच संवाद साधेन, व नंतर माझ्याशी संपर्क साधा. मला हे माहिती आहे की श्री. भुजबळ यांनी संबंध राज्याची अन्नधान्याची जी गरज आहे त्याची पूर्तता करून ठेवली आहे. आपणांस यावर काही अडचणी येत असतील तर त्यावर मार्ग निश्चित काढला जाईल.
बुलडाणा येथून सतीश यांनी विचारले की लॉकडॉऊन वाढणार अशी अफवा आहे, तर आम्ही काय करावे?
सध्याचा आपला निर्णय आणखी दोन आठवड्यांचा आहे. आपण या दोन आठवड्यांमध्ये पूर्ण काळजी घेतली, नियमांचं पालन केलं, तर माझ्या दृष्टीने लॉकडाऊन वाढवण्याची गरज नाही. परंतु आपण जर या नियमांची, दिलेल्या गाईडलाईन व सूचनांची अंमलबजावणी नाही केली तर आपण आपलं संकट वाढवत आहेत आणि ती वेळ येऊ द्यायची नाही, हा निर्धार करून आपण त्याची अंमलबजावणी करूया.
सुशांत चोरगे यांनी विचारले की भाजी मंडईतील गर्दी कमी होत नाही, त्यात तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
लोकांनी भाजीपाला वगैरे दैनंदिन गोष्टांसाठी एक ठराविक वेळ ठरवण्याची गरज आहे. सकाळी एक तास जास्तीत जास्त वा संध्याकाळी अर्धा-पाऊण तास, यापेक्षा जास्त वेळ बाहेर पडायचे नाही, ही काळाची आपण सर्वजण मिळून घेऊया.
विश्वास सूर्यवंशी यांनी विचारले की ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, त्यांचे पुढे काय होणार?
आम्ही राज्यातील सहकारी साखर कारखाने व खासगी कारखान्यांना सूचना केलेल्या आहेत ही तुमच्या कारखान्यावर ऊसतोड कामगारांचा काम संपलं असलं तरी त्यांची निवासाची व्यवस्था तिथेच करा. दोन ते तीन आठवडे त्यांच्यासाठी भोजनाची आणि वैद्यकीय सुविधा करा. जर काही लोक हट्टाने घरी जायचं म्हणत असतील तर त्यांना पटवून द्या की सध्या प्रवास करू नका. पण तरीही जाणाऱ्यांना अन्नधान्य व त्यांच्या मेहनतीची रक्कम देऊन नंतरच पाठवा. पण शक्यतो त्यांचे कॅंप कारखान्यात आणखी तीन ते चार आठवडे ठेवण्याची व्यवस्था करा.

https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/228790418489299/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.