पोलिसांच्या तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराला ‘कात्री’ नको; उलट प्रोत्साहन भत्ताही द्या : आमदार महेश लांडगे

पिंपरी दि.२० प्रतिनिधी,  कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या ‘रिअल हिरों’च्या जोरावरच कोरोनाविरुद्धची लढाई आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आरोग्य सुविधांशी संबंधित कर्मचारी, डॉक्टर, पोलीस प्रशासनातील सर्व कर्मचारी यांच्या पगारामध्ये राज्य सरकार अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी कपात न करता उलट प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

राज्य सरकार तसेच महापालिका प्रशासनांतर्गत विविध अस्थापनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किमान २५ टक्के कपात करण्यात येईल, अशी चर्चा आहे. तसेच, दोन टप्प्यांत पगार करण्यात येईल, असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात किंवा दोन टप्पे असा विचार न करता उलट त्यांना पूर्ण पगार आणि प्रतिकूल परिस्थित कर्तव्य बजावल्याबाबत प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) देण्याची गरज आहे, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.

याबाबत बोलताना आमदार लांडगे म्हणाले की,  कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभागासह अत्यावश्यक सेवेत समावेश असलेले सर्व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून त्यांच्या वेतनात कपात करणे म्हणजे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण केल्यासारखे होईल. राज्यातील आर्थिक घडी विस्कळीत झाली असली, तरीसुद्धा ज्यांच्या जीवावर आपण या कोरोनारुपी संकटाला तोंड देत आहोत. त्या कर्मचाऱ्यांना अर्थात आपल्या ‘रिअल हिरों’ना प्रशासन म्हणून आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचा पगार खरंतर वाढवला पाहिजे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंतीपर निवेदन देण्यात येणार आहे.



जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.