वेगवेगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी फडणवीस यांनी ऑनलाईन चर्चा केली. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. जर आघाडी सरकारने करोनाच्या भीतीने बचावात्मक धोरण स्वीकारले, तर राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे धोक्यात येईल. तसेच सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण उद्योग, व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याचा आग्रह केला होता असेदेखील ते म्हणाले.
देशपातळीवर सरकारी यंत्रणेला करोनाशी लढण्यासाठी एक आराखडा तयार केला जात असून हॉटस्पॉट आणि कंटोनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे. हे लक्षात घेता करोनाचा प्रभाव नसलेल्या भागात लॉकडाऊन शिथिल करून जनजीवन हळूहळू सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे देश पूर्वपदावर येण्यास नक्की मदत होईल. तसेच करोना विरुद्धचा लढा अजून काही काळ सुरू ठेवावा लागणार आहे. त्यासोबत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गराजाही भागवाव्या लागणार आहेत. कामगार कायदाच्या माध्यमातून श्रमिक कामगारांचे संरक्षण करतानाच उद्योग-व्यवसाय कसे अडचणीतून बाहेर येतील याचाही विचार करण्याची आता आवश्यकता आहे. दुसऱ्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा सकारात्मक पावले उचलावे.
त्याचबरोबर चीनमधील बरेच उद्योजक महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. पाच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने मी बऱ्याच गोष्टी आणि बारकावे मला माहिती आहेत. गरज फक्त इच्छाशक्तीची आहे पैशाची नाही. सरकारने फक्त पीएलएफ फंडावर लक्ष दिले तरी राज्याला मोठी आर्थिक मदत मिळू शकते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.