उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असेल असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदी असल्याने त्यांनी घटनेचे वाचन केले पाहिजे जेणेकरुन त्यांना घटनात्मक हक्क व लोकांचे स्वातंत्र्य समजू शकेल, असे पवार म्हणाले . ईटीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सरकार कामगारांसाठी नवीन धोरणे तयार करणार असून या धोरणामध्ये मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश येणार आहे अशी माहिती योगी यांनी दिली होती. “कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,” असं यावेळी योगी म्हणाले होते. योगी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले होते. यावर शरद पवारांनी त्यांना खडेबोल सुनावले आहे .
तसेच राज्यात सुरु असलेल्या राजकारणावरही शरद पवार यांनी या मुलाखतीत भाष्य केले राज्यातील पराभव पचत नसल्याने विरोधक ‘ठाकरे’ सरकार पडण्याच्या तयारीत असल्याचेही शरद पवार म्हणाले . महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील राजकारण अस्थिर असल्याच्या चर्चा असून राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली यावर तुमचे मत काय? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे अस्थिर असल्याच्या केवळ अफवा आहेत. सरकारमधील सर्व मित्र पक्ष एका असून देशावर आलेल्या कोविड-१९ संकटाचा आम्ही सर्व मिळून सामना करीत आहोत. विरोधकांना पराभव पचत नसल्याने ‘ठाकरे’ सरकार पडण्याच्या तयारीत असल्याचे पवार म्हणाले.
तसेच राजकारणात तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसे बघता या प्रश्नावर पवारांनी त्याचे कौतुक केले. उद्धव ठाकरे एक चांगले मुख्यमंत्र आणि टीम लीडर म्हणून समोर आले आहे. उद्धव ठकरे हे सरकार आणि विधिमंडळासाठी नवीन आहेत. ते सरकार चालविण्याच्या जवाबदारीला गांभीर्याने घेत आहेत. त्यांची वर्किंग स्टाइल सकारात्मक आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना सल्ला-मशवरा देतात. ते स्वतः तासोन्तास काम करत असतात, अशा शब्दात पवारानी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले.