मुंबईतील खासगी दवाखाने वारंवार सांगूनही आपले दरवाजे उघडत नाहीत. यामुळे करोना सोडून इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या मुंबईकर नागरिकांना दवाखान्यांसाठी दारोदारी फिरावे लागते. सर्वांना कायद्याचा बडगा दाखवून चालत नाही आणि माणुसकी दाखवली पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी तरुण शाखा शाखांमधून मोठ्या संख्येने आपली नोंद करत समाजकार्याला स्वतःला वाहून घेत होते, आता त्याच धर्तीवर शिवसेना शाखा या खासगी दवाखाने करण्यात येणार असून यासाठी लवकरच शाखाप्रमुख यांना आदेश देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
संकटाच्या काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक हा कायम पुढे असतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून शिवसेनेच्या शाखांमध्ये तात्पुरते दवाखाने तुम्हाला कार्यरत दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतीत निवडक संपादकांच्या चर्चेत व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, दादर (जुना महापौर बंगला) येथे सुमारे तासभर झालेल्या चर्चेत करोनाबाबतच्या उपाययोजना आणि राज्य सरकारची तयारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी, विकास खरगे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, माहिती संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरूद्ध अष्टपुत्रे, शिवसेेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान उपस्थित होते.