Amol Mitkari मिटकरी यांच्या आमदारकीचा प्रवास अवघ्या एका वर्षात झालाय हे कुणाला सांगितलं तरी विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती आहे. आमदारकी..तीही विधानपरिषदेची म्हणालं की पडद्यामागची आर्थिक गणितं बघून भल्याभल्यांना घाम फुटतो. घोडेबाजारीच्या नावाखाली कसे व्यवहार होतात हे कायम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहतो. पण मिटकरी यांची आमदारकी झिरो बजेट असेल हे कुणाला पटणार नाही.
आपल्या किराणा दुकानात आलेल्या व्यक्तीला मागेल ते समान देने आणि आपला उदरनिर्वाह चालवणे अशा प्रकारचा आपला व्यवसाय करीत असतानाच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून प्रत्येकाच्या हाकेला ओ देत अमोल मिटकरी हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानपरिषदेत पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार झाले.कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना या माणसाने मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड च्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं.
घरावर तुळशीपत्र ठेवून वैचारिक मशागतीसाठी गावोगाव फिरला,बऱ्याच वेळेला जीवे मारण्याच्या धमक्या आणि हल्ले करण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यालाही निर्भीडपणे सामोरे गेला आणि आज त्याच कष्टाचे चीज झाले आणि शरद पवार यांनी विदर्भात सामान्यतल्या अति सामान्य कार्यकर्त्याला थेट विधानपरिषदेच आमदार बनविले.
काम करणारा एक सच्चा अन् सामान्य कार्यकर्ता तसेच प्रत्येकाला आपलासा वाटणारा अशी ओळख अमोल मिटकरी यांची निर्माण झाली आहे.सर्वप्रथम मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवा निमित्य बोलण्याची संधी मिळाली तर थेट त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही.संभाजी ब्रिगेडच्या चळवळीत प्रवेश करून गाव तिथे शाखा या उपक्रमाअंतर्गत व्याख्याने अशी त्यांची ब्रिगेडमधील सुरुवात आहे.पुढे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष अशी विभागणी झाल्यानंतर मिटकरींचा राजकीय पक्षात प्रवेश झाला. तिथे एक-दीड वर्ष काम केल्यानंतर अंतर्गत कलह झाला आणि अचानक काढून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मिटकरींना पक्षातून पदमुक्त केले.परंतु तरीही त्यांनी समाजसेवा मात्र सोडली नाही.ते जमेल तेवढी समाजसेवा करतच राहिले.परंतु हे सर्व करत असतांना त्यांनि त्यांच्या व्यवसायात मात्र खंड पडू दिला नाही.
राजकीय संभाजी ब्रिगेड मधून काढल्यानंतर अमोल मिटकरींनी सामाजिक संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला.जेजुरी येथे ४ ऑगस्ट २०१९ रोजी प्रविण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बैठकीत पडत्या काळात पवार साहेबांची साथ सोडून जाणाऱ्या लोकांना विचार करायला भाग पाडण्यासाठी विधानसभा निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीत अमोल मिटकरींच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आणि काही दिवसांतच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला.राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस,युवक समन्वयक अशा पदांवर नियुक्ती झाली. किरण गुजर यांनी बारामतीत भरावलेल्या शारदा व्याख्यानमालेत अजितदादा पवार यांनी मिटकरींच्या भाषणशैलीचे गुण हेरले आणि मिटकरींना आमदार करण्याचा शब्द दिला. तो शब्द आज खरा ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी यांची विधानपरिषदेवर निवड केली.
मिटकरी आपली वकृत्वशैली दाखवण्यासाठी संधी शोधत होते. पण नेत्यांच्या भाऊगर्दीत ती संधी कोण देणार. अखेर ती संधी मिळाली शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली. शिवनेरीवरुन सुरु झालेल्या यात्रेवेळी अमोल मिटकरीचं नाव कुणालाही माहित नव्हतं..पण या यात्रेची सांगता झाली तेव्हा मिटकरी यांच्या भाषणांची मागणी राष्ट्रवादीचेच उमेदवार करत होते. वाशिममध्ये यात्रा आली असताना अवघ्या 10 मिनिटे भाषण करायची संधी मिळाली आणि त्याचं सोनं करत मिटकरी यांनी मोठा पल्ला गाठला. आतापर्यंत व्याख्यान देऊन कुटुंब चालवणारे मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाले.. अर्थात शरद पवारांच्या मंजुरीशिवाय हे शक्य नव्हतं.
विरोधी पक्षावर आक्रमक आणि मुद्देसूद भाषणानं मिटकरी यांची पक्षात मागणी वाढत चालली. मग नेहमी गाडीनं प्रवास करणाऱ्या मिटकरींच्या दिमतीला पक्षाने हेलिकॉप्टर दिलं..वकृत्वाच्या जीवावर पहिल्यांदाच हवाई प्रवासाचं स्वप्नही मिटकरींनी प्रत्यक्षात उतरवलं. थोड्या नाही तर तब्बल ६५ सभा विधानसभा निवणुकीच्या निमित्तानं त्यांनी घेतल्या. पुरोगामी आणि शिवरायांचा विचार पुढं घेऊन जाणारे मिटकरी यांचा अवघ्या एक वर्षातला प्रवास राजकीय क्षेत्रातल्या बजबजपुरीत वेगळा दिसून येतो..एक साधा कार्यकर्ता ते थेट आमदार असं सध्याच्या राजकारणात होणं तसं दुर्मिळच..पण नशिबाची साथ आणि वकृत्वाच्या वरदानानं मिटकरी ते करुन दाखवलंय.
यावरून एक लक्षात येतं की अडचणींमध्ये संधी शोधल्यास यश हमखास पदरात पडते, हेच अमोल मिटकरी यांच्या संघर्षमय जीवनाकडे पाहिल्यानंतर दिसून येते, एवढे मात्र निश्चित.
एक साधा कार्यकर्ता ते थेट आमदार असं सध्याच्या राजकारणात होणं तसं दुर्मिळच..पण नशिबाची साथ आणि वकृत्वाच्या वरदानानं मिटकरी ते करुन दाखवलंय. Amol Mitkari
अभिजित पडोळे
(सदरील मत हे वयक्तिक आहे)
Amol Mitkari