सैन्य सैर भैर झालंय.. उद्धव ठाकरे जागे व्हा!


 
Sinhagad Times

ज्यावेळी महाराष्ट्रावर निसर्गाने कोयना भूकंपाचे संकट बेतले हते,तेव्हा महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण भूकंपग्रस्त परिसरातील लोकांना सांगायचे "उशाला भूकंप घेऊन झोपायची सवय लावा.." भूकंपाच्या मालिकेनंतर त्यांनी तो धाडसी मंत्र महाराष्ट्राला दिला होता. आता कोरोना मालिकेने महाराष्ट्राची झोप उडविली आहे! म्हणूनच..."महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे जागे व्हा.."महाराष्ट्राचे "सामाजिक मन" अस्वस्थ आहे. काय केले पाहिजे? राजा मानेे

महाराष्ट्र अस्वस्थ आहे. सर्वसामान्य रयतेला नक्की काय करायचं आणि काय चाललंय हे उमजत नाहीये. अशा परिस्थिती केवळ कोरोनाची चर्चा आणि तीही बेफिकीरपणे  करण्याची साथ राज्यभर पसरते आहे. काम ठप्प ,उद्योग ठप्प ,रोजीरोटीची सर्व मार्ग ठप्प,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आता पुढे काय होणार, या प्रश्र्नाने चिंतित झालेली कुटुंब! कोट्याधीश असो वा झोपडपट्टीवासी प्रत्येक कुटुंबातील आजचे वातावरण हे थोड्याबहुत फरकाने असेच आहे. आज राज्य म्हणून आम्हाला खरी चिंता वाटते ती राज्याचा गाडा हाकणारी गाव पातळीवरील मंडळी, जी सैनिकाच्या रूपात डाऊनलोड अगदी पहिल्या दिवसापासून लढत होती, ती मंडळी आता  सैरभैर झाल्याची!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या विरोधात युद्धाचे रणसिंग फुंकताना, ज्या परिपक्व कुटुंब प्रमुखाची कणखर भूमिका कृतीने महाराष्ट्राला दाखविली. त्याचे उभ्या महाराष्ट्राने कौतुक केले. "शाब्बास उद्धवजी" या शीर्षकाने दिनांक ४ एप्रिल रोजी मी पहिला लेख लिहिला होता. त्या लेखाची आज आठवण करून देण्याला कारण आहे. राज्य कोरोनाचा सामना करीत असताना, राजकारणाच्या सारीपाटावरील सोंगट्या उड्या मारतच होत्या! कधी राजभवनात कधी, नागपूरच्या वाड्यावर, कधी बारामतीत, तर कधी दिल्लीत सोंगट्यांचा खेळ चाललेला होता. त्याच वेळी उभा महाराष्ट्र मात्र उद्धव ठाकरे यांच्या परिपक्व दृष्टिकोनाचे तोंड भरून कौतुक करीत होता.

..नवा डाव!

देशातील आणि राज्यातील चौथा डाऊनलोड संपतासंपता बरेच पाणी वाहून गेले आहे. आता नव्याने युद्धाचा डाव मांडण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन पोलीस आरोग्य यंत्रणा स्वयंसेवी संस्था आणि दानशूर लोकही आता थकले आहेत. या वास्तवाचे भान ठेवण्याची वेळ आली आहे. थकलेले सैन्य आणि अस्वस्थ जनता या वातावरणात कोरोना विरुद्धच्या महाराष्ट्राच्या लढाईत "नवी जान" आणण्याची गरज आहे. कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा प्रतीक रतीब प्रत्येकाच्या घरी नित्यनेमाने पडतो आहे. प्रसारमाध्यमांच्या भडिमाराने देखील प्रत्येक कुटुंबाची आकडेवारीची अक्षरशः घोकंपट्टी सुरू आहे. जगाच्या तुलनेत आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचाही कोरोनारुग्णवाढीचा दर कमी आहे, हेही खरे आहे. ‌ त्यामुळे येथे पुन्हा आकडे मांडण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. पण कोरोना साथीत मुंबईसह महाराष्ट्र आजही देशात आघाडीवर आहे,हे कटूसत्य कोण नाकारणार?

चौथा लॉकडाऊन सरताना आपण गंभीर परिस्थितीच्या वळणावर येऊन थांबलो आहोत. तिचा विचार करू जाता कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या अर्थाने जागे होण्याची गरज आहे. शेतीची कामे आणि व्यवहार सुरू ठेवण्याचे धोरण शासनाने सदैव ठेवले असले तरी शेतकऱ्याचे कंबरडे मोडणे मात्र सरकार  रोखू शकलेले नाही. शेतकरी सर्वबाजूंनी अडचणीत आलेला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सामान्य माणुस आर्थिक संकटात सापडलेला आहे. हाताला काम नाही. घरात  होते तेवढे पैसे संपलेले आहेत.आता रोजीरोटीचा मार्ग खुला झाला तरी आर्थिक विवंचना संपणार नाही. मोठे उद्योग बंद म्हणून त्यांच्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योगही बंद . सरकारने उद्योग सुरू करायला परवानगी देऊनही कमी क्षमतेने लघुउद्योग चालविणे म्हणजे भरमसाठ तोटाच!अशा वास्तववादी अडचणीमुळे महाराष्ट्रातील उद्योग-व्यापार घायकुतीला आलेला आहे. मध्यमवर्गीय नोकरदारही आता घरात रिकामा बसून थकलेला-वैतागलेला आहे. पगार कमी होणार, नोकरी जाऊ शकते या धस्तीने तोही चिंतेत आहे.

"सामाजिक मन" अस्वस्थ

हातावरचे पोट असणाऱ्यांना शासनाने दिलेल्या मोफत धान्याने आधार दिला पण असे किती दिवस चालणार? या प्रश्नाने तोही वर्ग धास्तावलेला आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखाने कितीही आधार देण्याची भाषा केली तरी वास्तव मात्र वेगळेच सांगत असल्याने महाराष्ट्राचे "सामाजिक मन' कमालीचे अस्वस्थ बनलेले आहे. ज्यांचा बिनीचे सैनिक म्हणून आपण नेहमीच कौतुकाने उल्लेख करत आलो आहोत, ती शासकीय यंत्रणा आता ठिसूळ बनलेली आहे. जिल्हा प्रशासनाचा, तालुका प्रशासनाशी समन्वय नाही आणि तालुका प्रशासनाचा गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांची समन्वय नाही. "गाईडलाईन" तर आहे, पण अंमलबजावणीची जबाबदारी नक्की कोणाची? कोणत्या विभागाची,या प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने "तेरी भी चूप,मेरी भी चूप" हे धोरण राज्यभर अवलंबिले जात आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊनवेळी संपूर्ण प्रशासन उस्फूर्तपणे कामावर तुटून पडले होते.आज मात्र ती उस्फूर्तता राहिलेली नाही.एकाच्या खांद्यावरून दुसऱ्याच्या खांद्यावर जबाबदारी ढकलत राहणे, हीच कार्यपद्धती रूढ होऊ पहात आहे. त्याच कारणाने काही अपवाद वगळता अनेक जिल्ह्यात कोरोनाशी लढणारे सैनिक पांगलेले आहेत. सोलापूर सारख्या शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्हची मालिका खंडित होण्याऐवजी गतिमान होऊ लागली आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील पण, या विश्वव्यापी संकटावेळी चुका किंवा दोष सांगण्याऐवजी उपाय सुचविणे योग्य असते. इथून पुढचा काळ हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. सामान्य माणसापासून प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना पुढे कसे जायचे, याची ठोस दिशा सांगायला पाहिजे.

योद्ध्यांना इन्क्रिमेंट द्या

आज एकसूत्रीपणा हे तत्व गावपातळीपर्यंत पोहोचविणे हे खरे आव्हान आहे. महसूल -पोलीस यंत्रणा असो वा आरोग्य यंत्रणा असो, त्या यंत्रणेचे  प्रश्न समजून घ्यायला हवेत. चांगली कामगिरी केली तर विशेष इन्क्रिमेंट देण्याची प्रथा  आहे यापुढच्या काळात शासनाच्या प्रत्येक विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष प्रस्तावाचा विचार करायला हवा. आज कोरोना योध्यापैकी अनेकांचे पगार कमी झाल्याच्या बातम्या कानावर येतात. कौटुंबिक जबाबदारी प्रत्येकाला असते, ती पार पाडत असताना जीवावर उदार होण्याची हिम्मत  "कुटुंबाची सुरक्षितता"हीच देत असते.त्यामुळे कोरोना  योद्ध्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षितता देणारे धोरण व योजना युद्धपातळीवर तयार व्हायला हवे.

राजकीय तह करा..

आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्ष आणि त्या पक्षांचा गावपातळीवर पोहोचलेला कार्यकर्ता, ही आपल्या देशाची खूप मोठे शक्ती आणि सामर्थ्य आहे. निवडणुकीच्या कालावधीत पोलचीट प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविणे असो व पैशांचे वाटप असो, अगदी वाड्या-वस्त्यांवरपर्यंत आपल्या देशातील पक्षांचे कार्यकर्ते निष्ठेने पोहोचतात. त्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा आपण उपयोग कधी करणार? महाराष्ट्र प्रगती आणि पुरोगामित्वाच्या आघाडीवर नेहमी देशाला दिशा देण्याचे काम काम करीत आलेला आहे. शरद पवार ,मोहनजी भागवत, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखी अनेक ज्येष्ठ मंडळी, ही महाराष्ट्राची "सामाजिक संपत्ती" आहे, असे आपण मानतो आपत्तीकाळात तर पोटतिडकीने  मार्ग काढणारे म्हणून शरद पवारांचा आवर्जून देश उल्लेख करतो.राजकारणात अनेक जातींचे अनेक नेते आहेत. त्याही नेत्यांची शक्ती आता राजकारणाच्यापलीकडे जाऊन वापरण्याची संधी आहे. आजचा काळ हा हिंदुत्ववाद धर्मनिरपेक्षतावाद किंवा अन्य कुठल्याही वादाला कवटाळून न बसता केवळ मानवतावाद हाच आपला "शाश्वत तत्ववाद" मानून प्रत्येकाने काम करण्याची वेळ ही आहे.

छत्रपती श्री.शिवरायांनीही आपल्या झंजावाती शौर्य परंपरेत काही वळणांवर तह केल्याचे इतिहास सांगतो! आता महाराष्ट्रातही सर्वच राजकीय पक्षांनी तह करण्याची वेळ आलेली आहे. शिवरायांनी शत्रूंशी तह केला होता आपल्याला मात्र राजकीय भाऊबंदकीशी तह करायचाय!सर्व पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन आपल्या गाव आणि शाखा पातळीवरील कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास सर्व प्रश्न मार्गी लागतील.शासकीय यंत्रणेला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या निष्ठापूर्वक आणि प्रामाणिक प्रयत्नाची जोड मिळाल्यास कोरोनाला नेस्तनाबूत करण्याची क्षमता आणि सामर्थ्य महाराष्ट्रात आहे. आजवरच्या लॉक डाऊनलोड काळातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन तडकाफडकी बदल करण्याची गरज वाटते. तुकाराम मुंढे सारखे अधिकारी जे नागपुरात करू शकतात, अभिजित चौधरी सारखे अधिकारी जे सांगलीत करू शकतात, ते इतर जिल्ह्यात का घडत नाही? गरज पडल्यास चंद्रकांत गुडेवार राजेंद्र भोसले यांच्यासारखे अनेक लोकाभिमुख अधिकारी महाराष्ट्रात आहेत. ज्यांना आपण या लढाईत चांगल्या पद्धतीने वापरू शकता.मुंबईत तर प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेच्या शाखेचा सैनिक  अडचणीच्या काळात सहजी पोहोच,तो असे म्हटले जाते. एकूणच आता महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागे व्हावे. सर्वपक्षीय नेत्यांना एका छताखाली आणावे आणि महाराष्ट्राच्या जनतेला नव्याने जीवन सुरू करण्याची प्रेरणा,उभारी आणि शक्ती द्यावी!
राजा माने


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.