कोण आहेत मुंबई मनपाचे नवे आयुक्त इक्बाल सिंह चहल; वाचा सविस्तर

Iqbal sinh chahal

महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नगर विकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुबंईत दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या, आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबतच्या बेबनावामुळे प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते.

२० जानेवारी १९६६ रोजी जन्‍मलेल्‍या चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्‍के गुणांसह राष्‍ट्रीय गुणवत्‍ता यादीत स्‍थान पटकावले होते. इलेक्‍ट्रॉनिक्‍स एण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला.

भारतीय प्रशासकीय सेवेचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चहल यांनी नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली. त्‍यांच्‍या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीमध्‍ये सोपवली होती.

गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक न्‍याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या श्री. चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरी आधारे जानेवारी २०१८ मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार प्राप्‍त झाला. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय इ-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार २००२ देखील मिळाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार देखील मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्‍ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्‍या हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणूनदेखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.