जितेंद्र आव्हाडांनी केली कोरोनावर मात, सुखरूप पोहचले घरी


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोविड १९ विरोधात लढणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आज रात्री अखेर ठाण्यातील त्यांच्या घरी परतले आहेत. कोरोनावर यशस्वीपणे मात करत हा शरद पवारांचा शिष्य आणि ठाणेकर योद्धा आज अखेर घरी परतला आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय मित्रमंडळी समाधान व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आव्हाड यांना प्रथम ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे स्वतः आव्हाडांच्या तब्येतीवर देखरेख ठेवून त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देत होते. स्वतः ठाकरेंनी आव्हाड यांच्याशी फोनवरून संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक देखील आव्हाडांच्या प्रकृतीचे अपडेट घेत होते. सर्वांनीच आव्हाड लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची अत्यंत आस्थेने आणि काळजीने चौकशी केली. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी एखाद्या विजयी योद्ध्या प्रमाणेच त्यांना उत्तर दिले.

मतदारसंघासाठी दिवस-रात्र २४ तास राबणारे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी खरंतर हा अत्यंत कसोटीचा काळ होता. मात्र स्वतःचे गुरु आदरणीय शरद पवार यांच्यापासून संकटाशी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा घेतलेल्या आव्हाडांनी कोरोनाशी दोन हात करत अखेर विजयश्री खेचून आणली. पवार नामक गुरुचा कानमंत्र या शिष्याने खरा करून दाखवला. प्रचंड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड प्रतिकार शक्तीच्या जोरावर हा विजय आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.