एमएमआरडीएने उभारलेले कोविड समर्पित आरोग्य केंद्र मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द Covid19


Sinhagad Times

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे एमएमआरडीए मैदानावर कोरोना बाधितांवर उपचारांसाठी सुमारे १ हजार खाट क्षमतेचे कोविड समर्पित आरोग्य केंद्र (डी.सी.एच.सी.) उभारले आहे. या केंद्राचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे, मुख्य सचिव श्री. अजोय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इ. सिं. चहल यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. आर. ए. राजीव यांच्याकडून या केंद्राचे हस्तांतरण स्वीकारले.

देशातील हे पहिले असे खुल्या जागेवरील रुग्णालय (ओपन हॉस्पिटल)  आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे केंद्र उभारले गेले आहे. विशेषत: पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. येथे तीव्र बाधा नसलेल्या (नॉन क्रिटिकल) संक्रमितांवर म्हणजेच सौम्य व मध्यम रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जातील. कोरोना बाधित रूग्णांचा विचार करून या केंद्राची संपूर्ण रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी रूग्णांसाठी निवास, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आहे. स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनसह देखील सुसज्ज आहे. दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या रुग्णालयात दिले जाईल. स्वच्छतागृहे, स्नानगृहे यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तर, तैनात डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महानगर आयुक्त श्री आर. ए. राजीव यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ३५० कामगार आणि एमएमआरडीएचे ७० अधिकार्‍यांनी अथक कामकाज करत अवघ्या १५ दिवसात हे कोविड १९ केअर सेंटर उभारले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.