कोरोना काळातही मतदार संघातील कामांसाठी विविध ठिकाणी भेटी
पिंपरी: (
सिंहगड टाईम्स) भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार तथा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अत्यंत हायरिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. तसेच शहरात येणा-या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड कोरोनाचा केंद्रबिंदू बनले आहे. पिंपरी चिंचवड येथे दररोज १५० ते २०० च्या आसपास कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी राज्याचे बडे मंत्री तसेच स्थानीक पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकिला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते. त्यांनी मतदार संघातील कोरोनाच्या परिस्थितीवर मान्यवरांसोबत चर्चा केली. तसेच. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतलेल्या बैठकिला ते उपस्थित होते. यावेळी त्यांचा अनेक नेत्यांशी संपर्क आला आहे.
गेल्या आठवड्यात वायसीएम हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरला दिली होती भेट
आठ दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयात प्रशासनाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आमदार महेश लांडगे फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ होते. त्यांनी देखील शहराच्या कोणत्या भागात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. उपाययोजना म्हणून भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कशा पध्दतीने काम करत आहेत, याची माहिती फडणवीस यांना सांगितली. फडणवीस यांच्यासोबत आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. तसेच, मतदार संघातील ब-याच ठिकाणी हायअलर्ट करण्यात आला आहे. काही भागांना कोरोनाचा कंन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर, झोपडपट्टी भागाला कोरोनाचा केंद्रबिंदू म्हणून जाहीर केले आहे. अशा भागातील लोकांची होणारी तारांबळ पाहून आमदार लांडगे यांनी त्या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना मदत केली आहे. दैनंदिन गरजेच्या साहित्यासह जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला. दरम्यान त्यांचा लोकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क आल्याने त्यांणच्यात कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
'हायरिस्क कॉन्टॅक्ट' मुळे अनेकांना चिंता...
विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यातील विधान भवन येथे बैठक झाली होती. या बैठकीला जिल्ह्यातील आमदारांसह महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते. तसेच, गेल्या आठवडाभर आमदार लांडगे यांनी मतदार संघामध्ये मोठ्याप्रमाणात वेळ घालवला आहे. आठवड्यातून एकवेळ महापालिकेत भेट देऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे माजी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप आणि महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी यांच्या संपर्कात आमदार लांडगे आले आहेत.