जायखिंडीत अज्ञात व्यक्तीने केला रस्ता बंद

Road-closed-by-unknown-person-in-Jayakhindi


प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ; अनधिकृतपणे रस्ता बंद करणाऱ्यावर कारवाईची मागणी.

विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स-, दि.२५ - भोर व वेल्हे तालुक्याला जोडणारी ऐतिहासिक जायखिंड लॉकडाऊनच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीने मोठमोठया  दगडी रस्त्यावर टाकून मागील तीन महिन्यांपासून रस्ताच बंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

       करंदी (ता.भोर) येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरवड ते करंदी या मार्गावरील जायखिंड अडवल्याने शेकडो नागरिक व शेतकऱ्यांची कोंडी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात अनलॉक झालेले असतानाही अनधिकृतपणे असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे वेल्हे तालुका उपप्रमुख सुशांत भोसले यांनी केले आहे.

       या भागातील जवळपास चाळीस गावांचा दोन तालुक्यातील संपर्क तुटला असून अनेकांना दवाखान्यासाठी अतिशय जवळ असणारी करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी भोरला जावे लागत आहे. तर अनेकांची शेती या दोन्ही तालुक्याच्या हद्दीत असल्याने ट्रॕक्टरसारखी वाहने शेतीकामासाठी नेणे अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे नागरिकांसह अनेक शेतकऱ्यांची नाहक अडवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मागील तीन महिन्यांपासून ही खिंड अडवून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या व्यक्तीला प्रशासन पाठिशी घालते की काय? असा सवाल स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.

       या घटनेकडे प्रशासनाने केलेले डोळेझाक एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. या परिसरात मोठमोठया विषारी सापांचा मोठा वावर असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास अशा कृत्यांमुळे वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे अशक्य होऊन जाते. वेळेत उपचार न मिळाल्याने एखाद्याला जीवसुध्दा गमवावा लागू शकतो. त्यातच तालुक्यातील रस्ते लवकर दुरुस्त होत नसताना या दुर्गम भागातील रस्त्यांवर मोठमोठी दगडी टाकल्याने रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी तातडीने ही खिंड मोकळी करून नागरिक व शेतकऱ्यांची केलेली कोंडी सोडवावी अन्यथा शिवसेना आपल्या सेनेस्टाईलने रस्ता मोकळा करेल, असा इशारा शिवसेनेचे वेल्हे तालुका उपप्रमुख सुशांत भोसले यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.