या निमित्ताने शरद पवार यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चा घेतलेला आढावा
Sharad Pawar आजच्याच दिवशी ४९ वर्षांपूर्वी म्हणजे २२ जून १९७१ रोजी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेची स्थापना झाली. ही बारामती कृषिविकास संस्था ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे याचा आनंद आहे. बारामती पॅटर्न म्हणून जगभर गौरवली गेलेली संकल्पना म्हणजे प्रत्यक्षात ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचीच गेल्या पाच दशकांतली गौरवशाली वाटचाल आहे. बारामती पॅटर्न म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत उभं राहणं. ज्या तालुक्याचा ७० टक्के भाग कायमस्वरूपी दुष्काळी होता तिथून आज द्राक्षं निर्यात होतात, फळांचा रस देशाच्या कानाकोपऱ्यात जातो, जगातल्या मोठ्या साखळी खाद्यगृहांना इथून चीज पुरवलं जातं. इथल्या खेड्यातली मुलं उच्चशिक्षित बनून जगात आपला ठसा उमटवू लागली. याचं मोठं श्रेय ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अविरत कार्याला जातं.आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी-औद्योगिक समाजनिर्मितीची जी संकल्पना मांडली होती त्या प्रेरणेला ज्ञानाधारित समाजनिर्मितीची जोड देऊन हे नवं प्रारूप उभं राहिलं.
४९ वर्षांपूर्वी बारामतीचं चित्र विदारक होतं. शेतकरी कुटुंबात जन्मलेलो असल्याने शेतकऱ्यांच्या जीविताचे मर्म म्हणजे पाणी हे मला माहीत होतं. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी वाचवण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नाही याची मला जाणीव होती. त्याआधीच्या शतकात १८७६ ते १८७८ च्या दुष्काळात बारामतीतील लोकांचा असंतोष शमवण्यासाठी ब्रिटिश सरकारने निरा डाव्या कालव्याचे खोदकाम केले होते. या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणही बांधण्यात आले. या कालव्यामुळे बारामती तालुक्यातील ६५ गावांपैकी २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. परंतु तालुक्यातील उर्वरित ४३ गावाचा संपूर्ण परिसर उंचवट्याचा आणि चढ-उतारात असल्याने कालव्याच्या प्रवाह सिंचनापासून वंचित राहिला. त्यामुळेच तालुक्याच्या सुमारे दोन तृतीयांश भागातील शेती बेभरवशाच्या आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहिली. १९६६ झाली प्रायोगिक स्वरूपात तांदुळवाडी खेड्यात पाझर तलावाच्या कामाला सुरुवात झाली होती. वाहून जाणारे पाणी अडवल्याने पावसाळ्यात तांदूळवाडीचा पाझर तलाव पुढल्याच वर्षी पाण्याने तुडुंब भरला आणि तलावाच्या लाभक्षेत्रातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. शेतात पिके डोलू लागली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. १९७०च्या दरम्यान बंधू अप्पासाहेब पवार इस्राएलला जाऊन आले होते. तिथल्या प्रतिकूल परिस्थिती त्यांनी विकसित केलेली शेती आमच्यासाठी प्रेरणा ठरली होती.
मात्र १९७१ साली दुष्काळाचे भीषण चित्र दिसू लागले. त्यावेळी ऑस्ट्रेलियन मिशनरी भगिनी मिस हेजल स्कुज आणि मिस एडना वाझर या त्यांच्या कासा सोसायटीतर्फे स्थानिक दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना तेल, गहू, दुधाची भुकटी आदी गरजेच्या खाद्यवस्तू मोफत देत होत्या. ग्रामस्थांकडच्या या खाद्यवस्तू काही दिवसांतच संपून जातील आणि मूळ प्रश्न मार्गी लागणार नाही याची मला कल्पना होती. त्यामुळे त्यांच्या या मदतीचं रूपांतर आम्ही फुड फॉर वर्क या योजनेत केलं. दुष्काळात तालुक्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी फुड फॉर वर्क या योजनेअंतर्गत पाझर तलाव बांधण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली. पाझर तलावांच्या कामात श्रमदान करणाऱ्यांनाच या खाद्यवस्तूंचं वाटप सुरू केलं. ग्रामस्थांना मोफत काही नको असतं. दुष्काळी परिस्थीतीत श्रमाच्या मोबदल्यात जेवण मिळू लागलं आणि त्यातून ८० पाझर तलाव बांधून झाले. फुड फॉर वर्क या योजनेचे चळवळीत रूपांतर झाले. त्यानंतर आम्ही या मिशनरी भगिनींच्या सहकार्याने २२ जून १९७१ रोजी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर कामाला जोर आला. तब्बल २९८ पाझर तलाव बांधण्यात आले. हजारो एकर शेतजमीन ओलिताखाली आली.
परंतु केवळ शेतीवर भागणार नाही, शेतीला कृषी-निगडित उद्योगांची जोड दिली तरच तालुका स्वयंपूर्ण होईल हे मी ओळखलं होतं. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून मग शेती व ज्ञान यांवर आधारित औद्योगिक विकासाच्या वाटचालीचं सूत्रं आम्ही स्वीकारलं. या सर्व वाटचालीत माझे बंधू स्व. डॉ. अप्पासाहेब पवार यांचे सहकार्य मोठे होते.
पहिल्या टप्प्यात पाण्याचे संवर्धन आणि शेती विषयक धोरणे आखली गेली. १९७४ ते १९९० हा बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इतिहासातील दुसरा मोठा टप्पा. या टप्प्यात कृषीविषयक संशोधन कार्य मोठ्या प्रमाणावर झाले विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आधुनिक शेतीची मुख्य अंग आहेत हे ओळखून माळेगांव येथे ११० एकरांमध्ये शेतकऱ्यांना पिकांमधील शास्त्रीय प्रात्यक्षिके दाखवण्यास सुरुवात केली. डॉ. अप्पासाहेब पवार यांनी उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करण्याच्या आणि पाण्याचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून इस्रायलमध्ये पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले. पारंपारिक जलसिंचनाच्या पद्धतींचा त्याग करून शेतीला बारमाही पाणीपुरवठा होण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा यशस्वीरीत्या अवलंब केला. सिईंग इज बिलिव्हींग या प्रेरणेतून शेतकऱ्यांसाठी शिवार फेऱ्या आयोजित केल्या, शेतीत विविध प्रयोग केले, पिके व फळे यावरील नानाविध प्रयोगांच्या आणि विविध आधुनिक सिंचनाच्या पद्धतींचा व्यवहारिक अवलंब करण्यावर भर दिला.
ट्रस्टने सुरू केलेल्या यंग फार्मर्स असोसिएशनने अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान अभ्यासातून कार्यान्वित केले. आज विविध रंगानी नटलेली फळझाडांची लागवड केलेली ट्रस्टची आकर्षक अशी फळबाग फळांच्या शेतीसाठी दीपगृहाचे काम करत आहे. ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक डॉक्टर स्टॅफोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संत्र्यांच्या रोगाच्या निवारणासाठी मोठे संशोधन झाले. हे संशोधन म्हणजे ट्रस्टच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणारे ठरले.
पुढे शेतीपूरक जोडधंदे डेरी, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री, रेशीम उद्योग याचा प्रसार करण्यात आला. ट्रस्टच्या शेततळ्यावर एक स्वयंपूर्ण रेशीम उत्पादन केंद्र सुरू करण्यात आले. आज अगदी रेशीम किड्यांच्या कोश निर्मितीसाठी रेशीम किडे यांचे संवर्धन पालन-पोषण करण्यापासून रीलींग, डब्लिंग आणि टेस्टिंग ते रेशीम कापड विणण्यात पर्यंत सर्व काही एकाच छताखाली करणारे रेशीम उद्योग केंद्र भारतातले पहिलेच केंद्र ठरले आहे. शेतकऱ्यांना गोवंश पालन, डेअरी, मेंढ्या आणि शेळी पालन, कुकुटपालन, मधुमक्षिका पालन यासारखे अतिरिक्त जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पशुपालन व्यवस्थापन व्यवस्थापनातील तंत्र समजून घेण्यासाठी ट्रस्टने डेअरी युनिट सुरू केले. शेतकऱ्यांना मेंढी आणि शेळी यांची पैदास आणि पालनपोषणाची माहिती करून देण्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण शाळा घेतल्या जातात याशिवाय ट्रस्ट शास्त्रोक्त पद्धतीने वाढ केलेल्या अंडी घालू शकणाऱ्या कोंबड्या अगदी रास्त भावात उपलब्ध करून देते. याशिवाय शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळवून दिले. प्रात्यक्षिकाद्वारे औषधे जनावरांच्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक आणि लसीकरण यांचे मूलभूत महत्त्व पटवून दिले.
१९८० ते १९९० च्या काळात ट्रस्टने शेतकऱ्यांसाठी राज्यात, देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी स्टडी टुर्स आयोजित केल्या. मी देशाचा कृषिमंत्री असताना रोजगार हमी योजना फळबाग योजना अनेक धोरणे आखली आणि महाराष्ट्राला निर्यातदार बनवले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने केलेले उत्कृष्ट प्रयोग आणि संशोधन कार्य ओळखून ट्रस्टला पोस्ट ग्रज्युएट अभ्यासक्रमाचा आणि संशोधन केंद्राचा दर्जा बहाल करून गौरव केला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सहकार्याने चार वर्षांचा ॲग्रीकल्चर अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला. कृषी महाविद्यालयाच्या नेदरलँड बरोबरच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे विशेष प्रकारच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना नेदरलँडमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य झाले.
पुढच्या टप्प्यात म्हणजे १९९० पासून ट्रस्टने त्यांच्या कामाच्या कक्षा सामाजिक सेवा आणि शिक्षण तसेच सांस्कृतिक विकास यामध्ये रुंदावल्या. खरा विकास शिक्षण आणि साक्षरतेशिवाय साधला जाऊ शकत नाही याच चिरंतन सत्याला अनुसरून शारदा नगर येथील शैक्षणिक संकुलात ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक काम सुरू करण्यात आले. कुटुंबातील एक शिकलेली स्त्री फक्त तिचे नशीब पालटत नाही तर तिच्या अख्ख्या परिवाराचे भाग्य उजळते या शारदाबाईंच्या विचाराला अनुसरून ट्रस्टने १९९० मध्ये शारदा नगर येथे शैक्षणिक संकुलाची पायाभरणी केली आणि स्त्री-शिक्षणाला नवी चालना मिळाली. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणासाठी शारदाबाई पवार विद्या मंदिर, माध्यमिक शिक्षणासाठी शारदाबाई पवार विद्यानिकेतन, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्ससाठी शारदाबाई पवार महिला कनिष्ठ महाविद्यालय, बीए, बीएस्सी आणि बीकॉम साठी शारदाबाई पवार महिला पदवी महाविद्यालय, बीएडसाठी शारदाबाई पवार महिला शैक्षणिक महाविद्यालय, शारदाबाई पवार महिला शैक्षणिक कनिष्ठ महाविद्यालय, शारदाबाई पवार शारीरिक शिक्षणाचे महिला महाविद्यालय, शारदाबाई पवार महिला कलानिकेतन असे विविध अभ्यासक्रम शारदा नगर शैक्षणिक संकुलात सुरू करण्यात आले. आज ६ हजारांहून अधिक मुली शारदा नगर येथे शिक्षण घेत आहेत.
१९९२ मध्ये शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने ट्रस्टने कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज वाऱ्याचा वेग आणि कमाल तसेच किमान तापमान इत्यादी विश्लेषण सारखी पर्यावरणाचे दैनंदिन माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. विविध पिकांच्या मध्ये मार्गदर्शन केले जाते. पुढे वसुंधरा कृषी वाहिनी या भारतातील पहिल्या कृषी विकास रेडियो केंद्राचे स्थापना करण्यात आली. या वाहिनीच्या माध्यमातून हवामान वनस्पती आहार, बी-बियाणे, खते, बाजारपेठ, नव्या दिशा इत्यादींबाबत आधुनिक आणि विश्वसनीय माहिती शेतकऱ्यांना पुरवली जाते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी पुढाकार घेतला आणि महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा उपलब्ध करून दिल्या. यातून पुढे व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांची तयारी आणि पोलिस ट्रेनिंग यांसारखे सेंटर हे शारदा नगर मध्ये सुरू झाले. शेती बरोबरच औद्योगिक क्षेत्राची वाढ झाल्यानंतर प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी शारदाबाई पवार औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच आयटीआय ची सुरुवात झाली. बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी किंवा सातत्याने वाढणारे औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी साठी व्यवसायिक प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण उपयोगी ठरले. वेल्डर, पेंटर, फिटर, इलेक्ट्रिशन, डिझेल, मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट आर्किटेक्चर, ड्राफ्ट्समन, कम्प्युटर हार्डवेअर इत्यादी प्रकारचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम ट्रस्टतर्फे चालवले जात आहेत. व्यवसायिक आधुनिकतेच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देता यावे म्हणून ट्रस्टने स्वतंत्र असे प्रशिक्षण तसेच प्रॉडक्शन सेंटरही सुरू केले.
आज ट्रस्टच्या माध्यमातून भाजीपाला गुणवत्ता केंद्र, देशी गोवंश सुधारणा प्रकल्प, नीती आयोगाचे इन्क्युबेशन सेंटर, अद्ययावत रिसर्च सेंटर, सायन्स आणि इनोवेशन अॅक्टिव्हिटी सेंटर तसेच कॅलिफोर्निया, नेदरलँड, इस्रायल, थायलँड येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांसोबत केलेल्या करारामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेतीविषयक शिक्षण घेणे शक्य झाले आहे.
संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, सर्व विश्वस्त, शेतकरी आणि महिला भगिनी, पदाधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, परदेशी विद्यापीठे, विविध कंपन्या, राज्य आणि केंद्र सरकार यांचे सहकार्याने संस्था पुढे वाटचाल करत आहे. यासाठी सर्वांचे मी आभार मानतो, आपणा सर्वांच्या सहकार्य व शुभेच्छा यांमुळे संस्थेने शेती, दुग्ध व्यवसाय, फळबाग क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील विविध नवीन प्रकल्प पुढे आणले आणि यशाची, प्रगतीची नवनवीन दालने नेहमीच खुली करून दिली. त्याचबरोबर संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली याचा मनस्वी आनंद वाटतो. संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनपूर्वक शुभेच्छा!
शरद पवार