महिला दिन साजरा करण्यासाठी एक ठराविक दिवस का असावा ?महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक दिन हा महिला दिन असला पाहिजे. याच कारणासाठी आज आम्ही एक यशोगाथा घेऊन आलो आहोत. आज आम्ही सांगणार आहोत एका महिला बचत गटाच्या यशाची कहाणी...
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने पुणे जिल्ह्यातल्या सिंहगड भागात अवघ्या १० महिलांनी मिळून ‘ऋचा महिला बचतगटा’ची स्थापना केली. दरमहा १०० रुपये प्रती सदस्य अश्या बचती मधून सुरु झालेल्या या गटाचं रुपांतर आज एका चळवळीत झालेलं आहे. चला ऋचा महिला बचतगटाबद्दल आणखी जाणून घेऊया.
सुरवात करताना
‘सुचिता नानगुडे ’ सिंहगड भागात गोर्हे बु. (ता. हवेली जि. पुणे) गावच्या आहेत. सर्व सामान्य घरातल्या स्त्रियांच्या साहाय्याने त्यांनी व्यवसाय उभारायचं ठरवलं. यातूनच ‘अनेक’ महिलांच्या समवेत त्यांनी सिंहगड परिसरातील महिलांना संघटीत करण्यास सुरुवात केली. या संघटीत महिलांना घेऊनच २००६ रोजी ‘ॠचा महिला बचतगट’तयार झाला. सुरुवातील १०० रुपये प्रती महिना प्रती सभासद अशाप्रकारे बचत करण्याची सुरुवात झाली. हा बचतीचा पैसा साठवणे, त्यांचे हिशोब ठेवणे आणि नियम व अटींनुसार सभासदांना कर्ज वाटप करणे या कामांमधून अल्पावधीतच महिला व्यवहारात कुशल झाल्या. २००६ साली बचत गट स्थापन झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. कर्ज स्वरूपात पैसा वाटुन हा पैसा सर्व महिलांनी मिळून लहानसहान उद्योगात गुंतवण्यास सुरुवात केली.
पंख पासरताना
या महिला घरगुती व्यवसाय करू लागल्या. यातून त्यांना महिन्याला ४००० ते ५००० पर्यंत उत्पन्न मिळू लागले. आंगणवाडी आहार तयार करण्याचा व्यवसाय देखील सुरु केला. हाच व्यवसाय आजच्या घडीला गटाच्या उत्पन्नाचं मुख्य साधनांपैकी एक बनला आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांच्या कामाचं कौतुक केलं आहे. महत्वाची गोष्ट सर्व कामे या महिला स्वतः करतात. १०० रुपयांपासून सुरु झालेला हा गट आता एवढा स्वावलंबी झाला आहे की या गटाने स्वतःच्या मालकीची जागा देखील विकत घेण्याचा निर्णय आहे. या जागी उद्योग सुरु करणार असल्याचं ॠचा महिला गटाने सांगितलं. आर्थिक नियोजन, एकत्रितपणे केलेला व्यवसाय आणि बचत या तीन गोष्टींच्या आधारे उभारलेला ॠचा महिला बचत गट अल्पावधीतच एक आदर्श ठरला. ॠचा महीला बचत गटाने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याबरोबरच सामाजिक कार्यालाही सुरुवात केली आहे. एप्रिल ‘बेटी बचाओ’ आंदोलनाला दिलेला पाठींबा दिला. अशी काही महत्वाची उदाहरणे देता येतील.
ही आमची सामाजिक जबाबदारी
या उपक्रमांमधून सामाजिक भान जपण्याचं कामही बचत गटाने करून दाखवलं आहे. इतरांना प्रेरणा ॠचा महिला बचत गटाची सुरुवात झाल्यापासून त्यांच्या कार्याने इतर अनेक महिलांना आणि महिला बचत गटांना प्रेरणा मिळाली. नवीन गट स्थापन करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना गट स्थापन करण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे तसेच प्रत्यक्ष उद्योग सुरु करून देण्यापर्यंत ॠचा महिला बचत गट स्वतः मदतीचा दुसऱ्यांना हात देत आहेत. यातून सिंहगड भागात आणखी बचत गटांची स्थापना झाली. अश्या प्रकारे याला एक चळवळीचं रूप आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. महिलांनी महिलांसाठी उभारलेला असा हा ॠचा महिला गट खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणादाई आणि क्रांतिकारी ठरला आहे. त्यांच्या पासून आणखी महिलांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. त्यांच्या या कार्याला बघून मनापासून वाटतं की याच आहेत खऱ्या सावित्रीच्या लेकी.
सकारात्मक बाब
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या सर्वत्र नैराश्य दिसून येत आहे. पण, या कठिण काळात देखील बचत गटांचे हे कार्य महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय असेच आहे. यामुळे कोरोनारूपी राक्षसाशी दोन हात करण्यात माता-भगिनी महत्त्वाची भूमिका तर जबावत आहेत. शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळत आहे.