वेल्हे पोलिसांची स्मार्ट कामगिरी ; ५० हजार २०० रुपयांच्या मुद्देमालासह कर्नवडीतील दोन चोरटे गजाआड अटक

वेल्हे पोलिसांची स्मार्ट कामगिरी ; ५० हजार २०० रुपयांच्या मुद्देमालासह कर्नवडीतील दोन चोरटे गजाआड अटक
विशाल भालेराव
पानशेत, दि.३ (सिंहगड टाईम्स) - पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या अतिदुर्गम कर्नवडी (ता.वेल्हे) येथील घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अवघ्या २४ तासात शिताफीने सापळा रचून गजाआड करण्यात वेल्हे पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्याचा छडा लावत  ५० हजार २०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना अटक करण्याची स्मार्ट कामगिरी वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांच्या नेतृत्वाखाली वेल्हे पोलिसांच्या टीमने केली आहे.

       याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम अनंता मालुसरे (रा. कर्नवडी) यांनी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याबाबत गुरुवारी (दि.२) वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. वेल्हे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ६०/२०२० अन्वये भादंवि कलम ४५४, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदरील गुन्ह्यामध्ये जुन्या वापरलेल्या ५० सोन्याच्या मणी(अंदाजे किंमत २० हजार), एक चांदीचे पैंजण (अंदाजे किंमत २००), सोन्याची कर्णफुले (अंदाजे किंमत १५ हजार), दोन पदकाची डोरले (अंदाजे किंमत १५ हजार) अशी एकूण ५० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. वेल्हे पोलिसांनी विशेष कौशल्य वापरून  शिताफीने सापळा रचून विकास विठ्ठल पवार व भाऊ नथू कचरे (दोघेही रा.कर्नवडी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ५० हजार २०० रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल अवघ्या २४ तासांच्या आत हस्तगत केला.

      वेल्हे पोलिसांच्या या तत्परतेमुळे वेल्हे पोलिसांवर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, पोलीस हवालदार दिनेश गुंडगे, पोलीस कॉन्स्टेबल अभय बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल अजय साळुंके यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.