पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड भाजपामधील अंतर्गत गटबाजी, सुंदोपसुंदी, फंदफितुरीला कंटाळून भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पिंपरी- चिंचवड शहर भाजपाची धुरा शहराध्यक्ष म्हणून सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोपवली होती. पण, पक्षातील काहीजणांचा त्यांच्या निवडीला विरोध होता. अनेकांनी खुला तर काहींनी छुपा विरोध केला. पक्ष म्हणून काम करीत असताना वैयक्तिक हेवेदावे उफाळून आले. काम करण्याचे किंवा निर्णय घेण्याचे स्वतंत्र मिळाले नाही. याउलट, शहराध्यक्षपदाच्या कामात अनेकांनी सोयीस्कर हस्तक्षेप सुरू केला. पक्षहितासाठी स्व- पक्षातील नाराजांची मोट बांधण्याची भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली. पण, पक्षात जुने, नवे आणि कथित निष्ठावंत अशी गटबाजी संपता संपत नव्हती. अखेर आमदार लांडगे यांचा संयम सुटला. आज लांडगे यांनी तडकाफडकी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे शहर भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.
आता भाजपाचा चेहरा कोण?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका अवघ्या दीडवर्षांवर आल्या आहेत. अशा परिस्थितीत शहर भाजपाकडे आमदार महेश लांडगे यांच्या रूपाने प्रभावी चेहरा होता. आमदार लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ताकदीवर भाजपा प्रदेश नेते पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा 'कमळ' फुलवण्याची स्वप्ने पाहत होते. मात्र, पक्षातील गटबाजीमुळे भाजपाचे आगामी निवडणुकीत पानिपत होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे कारण सद्यस्थितीला पिंपरी चिंचवड भाजपाकडे महेश लांडगे यांच्यासारखा 'मास लीडर' चेहरा नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भाजपचे मोठे नुकसान तर राष्ट्रवादीला फायदा
महेश लांडगे हे स्वबळावर निवडून आलेले होते.त्यामुळे त्यांच्या समर्थकांची संख्या प्रचंड आहे.लांडगे यांनी तरुणाईचा मोठा सपोर्ट आहे म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या चेहऱ्याशिवाय दुसरा प्रभावी चेहरा भाजपकडे नाही.मात्र या अंतर्गत कलाहाचा परिणाम भाजप पक्ष संघटनेवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.अर्थात याचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस नक्की उचलेल यात कोणतीही शंका नाही.