विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स)- थोड्या पैशांच्या मोहापायी आपल्या खाकी वर्दीशी बेईमानी करणाऱ्या जुन्नर व शिरूर तालुक्यातील चारही पोलीसांवर कठोर कारवाई करून दोन जणांना निलंबित करण्यात आले, तर दोन जणांना बडतर्फ करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केलेल्या कारवाईतून पैशाच्या मोहापायी खाकी वर्दीशी बेईमानी करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. असा संदेश या कारवाईतुन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.
नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि न्यायालयात लवकरात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी तसेच या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना अटक न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत विभागाने (ता.११)रोजी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व पोलीस नाईक धर्मात्मा हांडे यांना अटक केली होती. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तडकाफडकी कारवाई करून सहाय्यक पोलीस निरिक्षक अर्जुन घोडे पाटील यांना सेवेतून(ता.१२) निलंबित केले. तर पोलीस नाईक धर्मात्मा हांडे यांना सेवेतून बडतर्फ केले.या दोन्ही पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत. तसेच शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या आवारात पकडलेला वाळु ट्रकमधील वाळू लपविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिस नाईक हेमंत पांडुरंग नाईक यांना सुद्धा पाटील यांनी (ता.१२) रोजी सेवेतून निलंबित केले आहे. तर शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी किशोर ज्ञानदेव दवडे यांना गुटखा वाहतूक प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी मांजरवाडी( ता.जुन्नर )येथे पकडले होते. त्यांच्याकडून तीस हजार रुपयांचा गुटखा व कार जप्त केली होती. पोलीस अधीक्षक पाटील यांनी दवडे यांचे १२एप्रिल रोजी तडकाफडकी बडतर्फ केले होते. खाकी वर्दीशी बेईमानी करणाऱ्या दोन्ही तालुक्यातील चारही पोलीसांवर अधीक्षक संदिप पाटील यांनी केलेल्या या धाडसी कारवाईने पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सावध झाले असतील एवढे नक्कीच.