महापुरुषांच्या नावाचा दुरुपयोग करुन आर्थिक कमाई करणाऱ्या साबळे वाघिरे आणि कंपनीच्या व्यवसायाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे, या मागणीसाठी आग्रही असलेल्या संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे. बिडीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आपल्या स्टाईलने कारवाई करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या बिडीची विक्री थांबवावी, या मागणीकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने 2011 ते 2013 या कालवधीत राज्यात आंदोलन छेडले होते. याआंदोलनानंतर कंपनी व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेत मान्य केलेल्या मागणीनुसार बिडी बंडलवरुन संभाजी महाराजांचे चित्र हटविण्यात आले आहे.
मात्र, बिडीचे अचानकपणे नाव बदलणे व्यावसायिक अडचणीमुळे शक्य नसल्याचे सांगत, या नावात हळूहळू बदल करण्याचे लेखी आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले होते. मात्र कंपनीने हे आश्वासन पाळले नाही.