पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना मागील सहा महिन्यांपासून आपण राबवित आहोत. यासाठी कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष, खाजगी रूग्णालये ताब्यात घेणे या बाबी झालेल्या आहेत. तदनंतर शासनाच्या व पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर येथे जंम्बो रूग्णालय सुरू करण्यांत आले.बाणेर व बालेवाडी येथे डेडी केअर रूग्णालय देखील सुरू करण्यांत आले. अॅम्ब्युलन्स संदर्भात येणा-या अडचणीतून जीव गमवावा लागला आहे. या अनुषंगाने पुण्यातील क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत किमान एकतरी कार्डिॲक अॅम्ब्युलन्सची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांकडे केली आहे.
"कार्डिॲक अॅम्ब्युलन्स अभावी पुणे शहरातील नामवंत व्यक्तींना जीव गमावायला लागला आहे. अशा प्रकारे नामवंत व्यक्तींवर वेळ येते, तर सर्व सामान्य नागरिक कोणत्या संकटातुन जात असेल याची कल्पना ही करणे अशक्य आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत किमान एक तरी कार्डिॲक अॅम्ब्युलन्स असणे अत्यंत गरजेचे आहे" - विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ; पुणे महानगर पालिका.
पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधात्क उपाय योजना अंतर्गत मनपाने अंदाजे ३०० कोटी रूपये खर्च केले आहेत. पुणे शहरात सर्व सुविधांयुक्त सुसज्ज रूग्णालये, अॅम्ब्युलन्स, तज्ञ डॉक्टर्स व इतर स्टाफ उपलब्ध आहेत, असे असतानाही वेळेवर उपचार न मिळाल्याने काही रूग्णांना मृत्युस सामोरे जावे लागले, ही दुर्देवी व खेदजनक बाब आहे. निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन आणि आता पत्रकार पांडुरंग रायकर तसेच पुणे शहरातील अनेक नागरिकांना उपचारा संदर्भात, अॅम्ब्युलन्स संदर्भात येणा-या अडचणीतून जीव गमवावा लागला आहे. तसेच माजी महापौर कै.दत्तात्रय एकबोटे यांचा देखील वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तरी टिव्ही ९ वृत्तवाहिनीचे कै.पांडुरंग रायकर यांच्या प्रमाणे सामान्य रुग्णांवर वेळ येवु नये यासाठी पुणे महानगरपालिकेने त्वरीत अत्यावस्थ रुग्णांवर वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत किमान एकतरी कार्डिॲक अॅम्ब्युलन्सची व्यवस्था तातडीने करण्यात यावी जेणेकरून अश्या घटना परत घडणार नाहीत.