पुणे महापालिकेने साकारलेले बाणेर डेडीकेटेड कोविड रुग्णालया आपण सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरु करत असून ३१४ बेड्स उपलब्ध होत आहेत, ज्यात २७२ ऑक्सिजन तर ४२ आयसीयू बेड्स असणार आहेत. काल महापौर मुरलीधर मोहळ यांनी सेंटरला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच विविध सूचनाही यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत. यासाठी मिळणारे उपचार, जेवण, वैद्यकीय सुविधा आणि इतर सर्व व्यवस्थांची माहितीही यावेळी घेतली. याबाबत रुग्ण आणि नातेवाईक समाधानी असल्याचे चित्र आहे.
बाणेर सेंटरसाठी २६ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असून त्यापैकी १५ कार्यान्वित आहेत, तर येत्या दोन दिवसांत आणखी एक व्हेंटिलेटर उपलब्ध होईल. आपल्या पुणे महापालिकेच्या ०२०-२५५०२११० या क्रमांकावर नोंदणी केले जाणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जात आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी ५६ डॉक्टर्स, ५७ नर्स आणि ५१ मदतनीस उपलब्ध आहेत. आजपर्यंत या रुग्णालयात १०५ रुग्ण दाखल झाले असून सद्यस्थितीत ८ रुग्ण आयसीयूमध्ये तर ७० रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.
रुग्णांच्या उपचारासाठी सेंट्रलाईझ पद्धतीने मॉनिटरिंग सिस्टीम 'जम्बो'प्रमाणे या रुग्णालयातही बसवण्याच्या सूचना दिल्या असून याबाबत तातडीनं कार्यवाही करण्यासही सांगितले आहे. शिवाय नातेवाईकांना रुग्णांशी संवाद साधता यावा, यासाठी नातेवाईक कक्षात रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा सूचनाही तातडीनं दिल्या आहेत.
यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगसेविका सौ. ज्योतीताई कळमकर, सौ. स्वप्नालीताई सायकर, श्री. गणेश कळमकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, उपायुक्त नितीन उदास, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यासह सेंटरचे डॉक्टर्स आणि महापालिकेचे विविध अधिकारी समवेत होते.