गणेश रायकर
सातबारा उतारा हा वाचनास अधिक सोपा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी सातबारा उताराच्या नमुन्यामध्ये बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून लवकरच त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच सात-बारा उताऱ्यामध्ये बदल होत आहे. ऑनलाइन सातबारा उताऱ्यामध्ये सुरक्षिततेसाठी वॉटरमार्क आणि ई महाभूमीचा लोगो वापरण्यात येणार आहे.
सध्याचा गाव नमुना नं.७/१२ मध्ये अधिका अधिक जमीन विषयक तपशिल खातेदारांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कालानुरूप काही बदल करून, तो संबंधितांना समजण्यासाठी अधिकसोपा होण्यासाठी संगणकीकृत गाव नमुना नं. ७ मध्ये सुधारणा केली गेली आहे. नागरिकांना नव्या स्वरूपातील सात-बारा उतारा लवकरच मिळणार आहे. नव्या स्वरूपात येणाऱ्या सात-बारा उताऱ्यामध्ये शासनाचा व ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क असणार आहे हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार आहे तसेच पहिल्यांदाच शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सात-बारा उतारा असणार आहे.
आता सातबारामध्ये साधारणतः १२ प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे ते खालीलप्रमाणे:
सुधारीत "गाव नमुना नं. ७ अधिकार अभिलेख पत्रक" मधील तपशिलाच्या बाबी :
1. गाव नमुना नं. ७ मध्ये गावाच्या नावासोबत LGD (Local Government Directory) कोड दर्शविण्यात येईल.
2. गाव नमुना नं. ७ मध्ये (अ) लागवडीयोग्य क्षेत्र व (ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात येईल..
3. गाव नमुना नं.७ मधील क्षेत्राचे एकक नमुद करुन यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक वापरण्यात येणार आहे.
4. गाव नमुना नं. ७ मध्ये खाते क्रमांक हा पूर्वी इतर हक्क रकान्यासोबत नमूद केला जात असे, यापुढे खातेक्रमांक खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल,
5. गाव नमुना नं. ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आत्ता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून (Strike through) दर्शविण्यात येतील.
6. कोणत्याही गाव न नं. ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्या खाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येईल. तसेच संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एक ही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.
7. कोणत्याही गाव न नं. ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकान्याच्या खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनाक हा नवीन रकाना समाविष्ट करुन दर्शविण्यात येईल.
8. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखद्या स. नं. / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास, शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.
9. गाव नमुना नं. ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक गाव नमुना न.७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील.
10. गाव नमुना नं. ७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात येईल, त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल.
11. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात येतील. तसेच बिनशेतीच्या गा. न. नं. ७ मध्ये पोट खराब क्षेत्र, जुड़ी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत
12. बिनशेती क्षेत्राचे गाव नमुना नं. ७/१२ साठी एकत्रितपणे गा. न. नं. १२ छापून त्याखाली सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नं.१२ मधील माहिती भरण्याची आवश्यकता राहिलेली नाही. सबब अकृषक क्षेत्राकरिता गा. न. नं. १२ हा गा. न. नं. ७ च्या सह येणार नाही.
सध्या अनेक उतार्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र भविष्यात अशी अडचण येणार नाही. सातबारा उतार्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसुलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल.