कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आग्रही पुढाकार घेतला आहे. पवारांच्या आदेशानुसार नागरिकांच्या सहाय्यासाठी व कोविड विषाणूचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोविड ब्रिगेड उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.
पक्षाच्यावतीने पुणे शहरात नागरिकांसाठी एनसीपी पुणे सिटी कोविड हेल्पडेस्क सुरू करणार आहे. यामार्फत कोविड हॉस्पिटलची अद्यावत माहिती, टेस्टिंगच्या सोयी, अॅम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र, इतर वैद्यकीय सोयी आदींची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या अंतर्गत कार्य करण्यासाठी विधानसभानिहाय राष्ट्रवादी ब्रिगेड तातडीने तयार करण्यात येणार आहे. या ब्रिगेडमध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा असल्यास त्वरित विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहनही वंदना चव्हाण यांनी केले आहे.
सहभागी होणारे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी झूम अॅपद्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.9) करण्यात आले होते. पुणे विभागीय आयुक्त सौरभ सौरव राव, अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.