"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निम्मित


 "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद"

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी आजोळी झाला. त्यांचे वडील पायगोंडा पाटील हे महसूल खात्यात कारकून म्हणून नोकरीस होते. त्यांच्या बदल्या होत असत. त्यामुळे भाऊरावांचे शिक्षण दहिवडी व विटा या गावी झाले. विटा येथे त्यांनी मराठी ५ वी व इंग्रजी पहिल्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना शिक्षणासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. तेथे छत्रपती शाहू महाराजांच्या राजवाड्यात राहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांच्या सहवासात कर्मवीरांना महाराजांच्या पुरोगामी विचारांची दीक्षा आपोआपच प्राप्त झाली. कोल्हापूर येथील राजाराम विद्यालयामधून त्यांनी इंग्रजी ६ वी पर्यंत शिक्षण घेतले.


त्यानंतर कर्मवीरांनी आत्मारामपंत ओगले यांच्याबरोबर प्रभाकर काच कारखाना, ओगलेवाडी येथे प्रचारक म्हणून काम केले. नंतर ते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याबरोबर किर्लोस्करवाडी येथे काम करीत होते. त्यानंतर सातारा रोड येथे धनजीशहा कूपर यांच्याबरोबर भागीदारीत काम करू लागले. कूपर यांनी करारानुसार नफ्याचा काही भाग शिक्षणावर खर्च करण्यास नकार दिल्याने त्यांनी राजीनामा दिला व त्यानंतर स्वत:ला शिक्षणकार्यात झोकून दिले. या कालावधीत कर्मवीर सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सहभागी होत असत.


कर्मवीरांनी शिक्षणक्षेत्रातील कार्यास शिक्षक प्रारंभ म्हणून केला. त्यांनी सातारा येथे खाजगी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. ते सर्व विषय शिकवत असत. त्यांना संस्कृत शिकवण्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी होकार दिला. पहाटे ५ वाजता उठून ते गजेन्द्रगडकर शास्त्री यांच्याकडे जाऊन स्वत: संस्कृत शिकत व नंतर विद्यार्थ्यांना शिकवत असत. त्यामुळे ते पाटीलमास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले. १९०९ मध्ये सातारा जिल्ह्यातील दुधगाव येथे त्यांनी ‘शिक्षण प्रसारक संस्थे’ची स्थापना केली व ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ नावाचे वसतिगृहदेखील सुरू केले.


समाजातील सर्व मुलांना शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच होते. त्याचा प्रारंभ त्यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले येथे ‘रयत शिक्षण संस्थे’ची स्थापना करून आणि  वसतिगृह सुरू करून केला. १९२१ रोजी नेर्ले या गावी दुसरी प्राथमिक शाळा व रात्रशाळाही सुरू केली. १९२४ मध्ये सातारा येथे वसतिगृह सुरू झाले. १९२७ मध्ये या वसतिगृहाचे नामाभिधान ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’ असे करण्यात आले. नामाभिधानाचा कार्यक्रम महात्मा गांधी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी सर्व जाती-धर्मांची मुले एकत्र राहतात, स्वत: जेवण तयार करतात व एकत्र बसून खातात हे ऐकून गांधींनी सामाजिक ऐक्याच्या या प्रयोगाची मुक्तकंठाने स्तुती केली. ‘साबरमती येथील आश्रमात हा प्रयोग यशस्वी करणे मला शक्य झाले नाही, पण येथे तुम्ही यश संपादन केले आहे ही गौरवाची बाब आहे. असेच प्रयोग चालू राहूद्यात,’ या शब्दांत गांधींनी कर्मवीरांना प्रोत्साहन दिले.


कर्मवीरांनी पुणे येथे १९३२ मध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची सोय व्हावी यासाठी ‘युनियन बोर्डिंग’ची स्थापना केली. संयुक्त मतदारसंघास मान्यता देणार्‍या गांधी-आंबेडकर कराराच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी ही स्थापना केली. ‘विद्यार्थ्यांनी सर्वच बाबतीत स्वावलंबी बनले पाहिजे’ ही शिकवण व ‘सामाजिक ऐक्याची भावना वसतिगृहाद्वारे जोपासली जावी’ हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचे कार्य कर्मवीरांनी केले आहे. याच तत्त्वानुसार संस्थेद्वारा आज ७६ वसतिगृहे चालवली जात आहेत.    


प्रशिक्षित शिक्षकच आपले कर्तव्य योग्य पद्धतीने व कल्पकतेने अधिक प्रभावीपणे करू शकतील अशी कर्मवीरांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी १९३५ मध्ये ‘अध्यापक विद्यालया’ची स्थापना केली. दुर्गम भागातील खेड्यात राहणार्‍या मुलांना किमान प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी कर्मवीरांनी व्हालंटरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊन १९३८ पासून जिल्ह्याच्या डोंगराळ व दुष्काळी भागात ‘व्हालंटरी स्कूल्स’ सुरू केली. हे कार्य ग्रामस्थांच्या व ध्येयवादाने प्रेरित होऊन अल्पवेतनावर काम करणार्‍या शिक्षकांच्या सहकार्याने सुरू केले आणि ते शासनाकडून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत चालू ठेवले. ५७८ खेड्यात या शाळांमुळे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झाला.


स्वातंत्र्यानंतर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्वीकारल्याने या शाळा शिक्षकांसह लोकल बोर्डाकडे वर्ग करण्यात आल्या. सध्या संस्थेतर्फे २४ प्राथमिक शाळा चालविल्या जातात. मुलींसाठी १९४२ मध्ये ‘जिजामाता अध्यापिका विद्यालयाची’ मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सध्या ८ अध्यापक विद्यालये व २ शिक्षणशास्त्र महाविद्यालये यांच्याद्वारा शिक्षक प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे.


वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांची इ. ७ वी नंतर माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी कर्मवीरांनी १९४० मध्ये ‘महाराजा सयाजीराव मोफत आणि निवासी विद्यालया’ची स्थापना केली. विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावे ही त्यामागची भूमिका होती. या विद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यास स्वत:ची कामे करण्याबरोबरच दररोज १ तास शारीरिक कष्टाची कामे करावी लागत असत. या विद्यालयात स्वावलंबन व श्रमप्रतिष्ठा या मूल्यांची जोपासना करावी लागत असे. आज संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील १४ व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात एकूण ४३२ विद्यालये चालवली जातात.


विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, बडोदा इत्यादी ठिकाणी जावे लागत असे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण गावाच्या जवळपास मिळाले पाहिजे असे कर्मवीरांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी १९४७ साली सातारा येथे ‘छत्रपती शिवाजी महाविद्यालया’ची स्थापना केली. हे महाविद्यालयही मोफत आणि निवासी होते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात असल्याने प्रारंभी विद्यार्थी संख्या मर्यादितच होती. त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करणे कठीण जाऊ लागले. कालांतराने महाविद्यालय सर्वांसाठी खुले करण्यात आले. शिवाजी महाविद्यालयाचे कालांतराने शाखानिहाय विभाजन केले गेले. आज तीनही महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच आज कला, वाणिज्य आणि विज्ञान या सर्व शाखांचे शिक्षण देणारी ४० महाविद्यालये संस्थेमार्फत चालवली जातात. अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे एक महाविद्यालय ही संस्था चालवते.


कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने १९४८ साली त्यांना एक लाख रूपयांचा निधी संत गाडगेबाबा यांच्या हस्ते अर्पण केला. या कार्यक्रमास राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पाठविलेल्या संदेशात ते लिहितात, “श्री भाऊराव की सेवा ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है।” गांधींनी प्रकट केलेल्या इच्छेनुसार कर्मवीरांनी शेवटपर्यंत शिक्षणप्रसार व त्या अनुषंगाने सामाजिक उन्नती व्हावी यास्तव सेवा केलेली आहे.


   १९४९ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य सुरू झाले. १९५३ मध्ये माण तालुक्यात टाटा न्यासाच्या सहकार्याने ग्रामविकासाचे कार्य सुरू झाले. त्याचवर्षी पुण्यात नाना वाड्यात ‘कर्मवीर भाऊराव विद्यालय’ सुरू झाले. त्याचवर्षी तालुक्यातील सैदापूर येथे महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. याचवर्षी कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय सुरू झाले. कर्मवीरांनी कार्य करताना आपणासमोर जी उद्दिष्ट्ये ठेवली होती त्यातील बहुतांश प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्य झाले. अनेक अडचणी व आपत्तींना तोंड देत ते वाटचाल करीत राहिल्याने त्यांना यशप्राप्ती झाली. त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य समजावून घेत असताना त्यांनी स्वीकारलेली व जपलेली मूल्ये याचा विचार करणे आवश्यक आहे. कर्मवीरांनी जातीभेदातीत दृष्टिकोनाचा स्वीकार करून सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.


संस्थेचे कार्य संस्थेत शिक्षण घेऊन तयार झालेल्या कार्यकर्त्यांनीच पुढे चालवावे असे कर्मवीरांना वाटत असे. ग्रामीण स्तरातून आलेले व शिक्षण घेऊन तयार झालेले शिक्षकच ग्रामीण परिसरात समरस होऊन कार्य करतील अशी कर्मवीरांची धारणा होती.


स्वावलंबनाची प्रेरणा हा कर्मवीरांच्या कार्याचा तिसरा विशेष होय. विद्यार्थ्यांनी स्वकष्टातून शिक्षण घ्यावे यासाठी असलेल्या ‘कमवा व शिका’ योजनेचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आज अनेक विद्यापीठांतून व महाविद्यालयांतून या योजनेच्या उपलब्धतेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण घेण्याची प्रेरणा प्राप्त झाली आहे.


कर्मवीरांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभीच ‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील, पददलित, आर्थिकदृष्ट्या मागासलेला व जातिभेदाने पोखरलेला समाज स्वाभिमानी बनून उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करीत राहावा’ या हेतूने शिक्षणाचा प्रसार केला. समाजोन्नतीच्या मूलभूत कार्यामुळे जनतेने त्यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी प्रदान केली आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरविले आहे. पुणे विद्यापीठाने १९५९ मध्ये डी. लिट. या पदवीद्वारे त्यांचा गौरव केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.