I am not afraid of such threats.- Sharad Pawar
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने धमक्यांचे फोन केले होते. मातोश्रीला उडवून देण्याची धमकी हस्तकाने दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी देशाबाहेरून धमकीचे फोन आले होते.
त्यावर खुद्द शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘यापूर्वी मला अनेकदा अशा धमक्यांचे फोन आले होते. मी त्यावेळीही त्याला गांभीर्याने घेतले नाही आणि आजही गंभीरपणे घेत नाही, असल्या धमक्यांना मी घाबरणारा नाही.’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसंच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतःला किती धमक्यांचे फोन आले त्याची यादी दाखवली आहे. त्यामुळे यावर आणखी काय बोलावे, असे मिस्कील उत्तरही शरद पवार यांनी दिले.
ते वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन आल्यानं खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत असून, लवकरच तथ्य बाहेर येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.