महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वात मोठी पोलिस भरती होणार असून तब्बल १२,५०० पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस भरतीबाबतच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार असून पदभरतीसाठी वित्त विभागाच्या दि. ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
अनेक पोलिसांना कोविडची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. पोलीस भरतीबाबत सरकारने घोषणा केल्यास बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली होती. मात्र आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता झाल्याने तरुणांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास 12 हजार 538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात जुलै महिन्यात आल्या होत्या. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली तसेच परीक्षार्थीना तयारीसाठी शुभेच्छा ही दिल्या.