पुणे : भाजपच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बालात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांड तसेच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हाॅस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार विरोधात जोरदार आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. वारंवार तक्रारी, निवदने व आंदोलन करून देखिल या असंवेदनशील आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन ’भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या’ वतीने छेडण्यात आले. त्याचे पडसाद पुणे जिल्ह्यामध्येदेखील पहायला मिळाले.
महाविकास आघाडीच्या काळात पुणे जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून कोविड सेन्टरमध्येही महिलांवर अत्याचार होत असताना राज्य सरकार झोपले कि काय ? असा सवाल पुणे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष्य राहुल शेवाळे यांनी आंदोलनादरम्यान विचारला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे परंतु राज्य सरकार कोणतीही अंमलबजावणी करताना दिसत नाही. राज्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार त्वरित थांबावेत, राज्यातील पोलीस यंत्रणा सक्रिय करून बाहेर बिनधास्त फिरणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी अशी मागणी शेवाळे यांनी यावेळी केली.
या वेळी हवेली तालूका अध्यक्ष धनंजय कामठे, सरचिटणीस हवेली पांडूरंग रोडे, अध्यक्षा मध्य हवेली तालुका वैशालीताई पवार, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग गाेरे, किर्ती हिंगे, सोनाली गोरड, सरिता घनवट, रुपाली कवडे, गणेश कांबळे, आशिष हिंगे, राजेंद्र पवार तसेच भाजप चे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.