अहमदनगर – राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे
विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार गटाचा विजय झालाय. चौंडी ग्रामपंचायतीतील 9 पैकी 7 जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला 2 जागा राखण्यात यश मिळालं आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला होता. त्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांनी मोठं लक्ष घातलं होतं. त्यामुळेचं राम शिंदे यांच्या गावातही रोहित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे.