सोलापूर आणि सांगली कर्नाटकात घेऊ ; बसवराज बोंमईयांची ठाकरे सरकारला धमकी
बंगळुरू : महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बेळगाव आणि सीमाभागात कन्नडिगांनी उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध केला.
"आता कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी थेट सोलापूर आणि सांगली कर्नाटकात घेऊ", असा इशाराच दिला आहे.
बसवराज बोंमई म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत बंगळुर येथे बोलताना सीमावादावर न्यायालयात आमची बाजू सिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या राज्याची भूमी सोडणार नाही.
सोलापूर आणि सांगली कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ते भाग कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा इशारा बोंमई यांनी दिला. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आमच्या ताब्यात असलेली एक इंचही जमीन आम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही, असे म्हटले आहे.