धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'

धायरी: धायरी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. खडकवासला धरणाजवळच गाव असून देखील प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पालिकेला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभी करता आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर धायरी गावाच्या माजी सरपंच आशा बेनकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रायकर मळा येथील पाण्याच्या टाकीजवळ जन आक्रोश आंदोलन केले.

काका चव्हाण म्हणाले, धायरीकरांचा पाणीप्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे, कारण लोकप्रतिनिधी आणि प्रशासन टँकर लॉबी पोसण्याचे काम करत आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. पालिकेने येत्या महिन्याभरात पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर सर्व धायरीचा पाणी पुरवठा बंद करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.

सुमित बेनकर म्हणाले, धायरी गावात भविष्यात उद्भवणारी पाणी टंचाई लक्षात घेता रायकर मळा येथे धायरी ग्रामपंचायत यांच्या वतीने १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत २०१५ ते २०१६ या कालावधीत ५ लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. तसेच कॅनॉल ते पाण्याच्या टाकीपर्यंत दाब नलिका टाकण्यात आली, परंतु गाव पालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर पालिकेकडून पाणीपुरवठा कार्यान्वित करणे अपेक्षित असताना गेल्या चार वर्षापासून अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी मागवावे लागत आहे. नागरिकांकडून पालिका कर वसूल करत आहे, परंतु त्या प्रमाणात मुबलक पाणी उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकरवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.

https://twitter.com/Maheshrameshha1/status/1411242622211874820?s=20 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, सुमित बेनकर, विनायक बेनकर, विकास कामठे, सुरेखा दमिष्टे, वैजंता पोकळे, भाजपचे संदीप पोकळे, माजी उपसरपंच संदीप चव्हाण, माधुरी याळगी, शिवसेनेचे दत्ता रायकर, सुशांत पोकळे, बाळासाहेब बेनकर आणि सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.