पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणिभारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सतत कुरबुरी आणि एकमेकांवर टीका करणे सुरु आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियामधून देखील एकमेकांवर टीका करायला हे नेते मागे बघत नाही. मात्र काल हे सर्व बाजूला ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पाहुणचार घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या कार्यालयाच्या पाहणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले गेले होते आणि त्यानुसार हा भेटीचा कार्यक्रम पार पडला होता.
कोणताही गाजावाजा न करता ही भेट झाली हे विशेष. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे हे उपस्थित होते तर भारतीय जनता पक्षाकडून खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे शहर कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बऱ्याच वेळ दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांसोबत चर्चा देखील केली. राजकारणमध्ये कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी नेतेमंडळी एकत्रित येऊ शकतात असा संदेशच जणू यावेळी दिला गेला.
कार्यकर्त्यांनी करायचे काय?
अनेक दिवसांपासून पुण्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये टीका-टिप्पण्यांचे सत्र सुरु आहे. कार्यकर्ते देखील एकमेकांना सोशल मीडियावर भिडत आहे. महापौर आणि थेट महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये मधल्या काळात आंबील ओढा प्रकरण, कोरोना काळातील कामांवरून टीका टिप्पणी सुरु होती. असे असतानाही नेते मंडळी एकत्रित आल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच एकमेकांशी वैर का ठेवायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे.