वारजे: शहरात दिवसेंदिवस घरफोडीचे प्रकार वाढत असून, शहरात एकाच दिवसात चार ठिकाणी फ्लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वारजे येथे भरदिवसा बंद फ्लॅट फोडून तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वारजे माळवाडी येथील दिंगबरवाडी शाळेजवळील शांतीसंकुल बिल्डींग मध्ये सदनिका फोडण्याचा प्रकार घडला असून १३,७०,०५०/- रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
जेठाराम जोशी (वय ४८, रा. दिगंबरवाडी, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. रविवारी ते राखीपौर्णिमेनिमित्त बहिणीकडे गेले होते. त्यांचे कुटुंबही सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ते परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
या संदर्भात वारजे पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेठाराम जोशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुंढे पुढील तपास करत आहेत.