पुणे: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत असलेली कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कालपासून पुण्यात ३९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनानं पुण्यात पुन्हा डोकं वर काढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत पुणे शहरात ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. २१६ कोरोनाबाधितांना उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
पुणे शहरात गेल्या २४ तासांत ८९६१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या ३०८२७९३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत पुणे शहरात ८८९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार दि.२५ ऑगस्ट, २०२१
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 25, 2021
◆ उपचार सुरु : २,०६६
◆ नवे रुग्ण : ३९९ (४,९४,१८५)
◆ डिस्चार्ज : २१६ (४,८३,२२१)
◆ चाचण्या : ८,९६१ (३०,८२,७९३)
◆ मृत्यू : ५ (८,८९८)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/3NeeUPD2Xp
सध्या पुण्यात २०६६ कोरोनाबाधितांवर शहरातल्या विविध खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उचपार सुरू आहेत. त्यापैकी २०८ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९४१८५ झाली आहे तर ४८३२२१ कोरोनाबाधितांना यशस्वी उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
सोमवारी पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या १०० च्या आत आली होती. सोमवारी पुण्यात ९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण दोनच दिवसांत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.