धायरीकरांचा पाण्यासाठी पुणे महानगरपालिकेसमोरच "हंडा बजाओ" आंदोलन, पालिकेच्यासमोरच फोडले मातीचे माठ 


बातमी लावण्यासाठी संपर्क 94220 51341

 पुणे: गेल्या चार वर्षांपासून धायरीकरांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या विरोधात मंगळवारी माजी सरपंच आशा बेनकर यांच्या नेतृत्वाखाली "हंडा बजाओ" आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी संतापलेल्या ग्रामस्थांनी रिकामे मातीचे माठ पालिकेच्या समोरच फोडून प्रशासनाचे लक्ष वेधले. 

आशा बेनकर म्हणाल्या, धायरी गाव २०१७ साली पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले. पूर्वी ग्रामपंचायत असताना २०१५-२०१६ साली आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेत ग्रामपंचायतने ५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली होती, आणि त्याच्या येणारी जलवाहिका टाकण्याचे काम देखील पूर्ण करण्यात आले होते. 

परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गाव महापालिकेत समाविष्ट झाले. त्यामुळे परिसरात जलवाहिन्या टाकण्याचे काम अपूर्ण राहिले. अवघ्या दोन महिन्यात टाकीमधून पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभी करता आली असती, पंरतु पालिकेने हा प्रश्न प्रलंबीत ठेवत पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी केली. आतापर्यंत ६० लाख रुपये यावर खर्च झाले आहेत. त्यावेळी या टाकीच्या वाहिकेसाठी अवघे २० लाख रुपये खर्च आला असता, परंतु त्यासाठी निधी न उपलब्ध करता टँकर माफियांचे खिसे कसे भरता येतील याकडे लक्ष दिले. त्यामुळे आजही धायरीकरांना पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. 

सुमित बेनकर म्हणाले, आम्ही गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाविरुद्ध लढा देत आहोत परंतु याची दखलच न घेतल्यामुळे २७ जून रोजी जन आक्रोश आंदोलन करत पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली, परंतु या आंदोलनाची दखल घेण्यासाठी पालिकेचे कोणतेच अधिकारी याठिकाणी उपस्थित राहिले नाहीत आणि पाणीप्रश्न तसाच रखडलेला ठेवण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे आज पालिकेच्यासमोरच आंदोलनाची भूमिका आम्हाला घ्यावी लागली. तरी पालिकेने हा प्रश्न तात्काळ सोडवित धायरीकरांना त्यांच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून दयावे अशी आमची मागणी आहे.

 



 यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्या संदर्भातील निवेदन स्वीकारून पाणीप्रश्न येत्या महिन्याभरात सोडवू असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 

या आंदोलनात धायरीचे माजी उपसरपंच विनायक बेनकर, खडकवासला मतदार संघाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन बेनकर, माधुरी याळगी, सुमित बेनकर, वनिता भालेकर, सुषमा शेंडकर, बाळासाहेब बेनकर, मयूर बेनकर, अक्षय बेनकर, गणेश राऊत, बबन बेनकर, बाबासाहेब बेनकर, राजेश राऊत, ललित सपकाळ, सतिश मिरकुटे, सुनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.