पुणे: एखाद्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन व्यक्ती असल्याने त्या कुटुंबाची दशा होते,त्यांना दिशा देण्याचे कार्य आत्मनिर्भर ही संस्था करत आहे हे कौतुकास्पद आहे' असे गौरोवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष व माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांनी येथे काढले.
किरकटवाडी येथे आत्मनिर्भर सोशल फौंडेशन व लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम यांच्या संयुक्त विद्यमाने '५ दिवसांचे मोफत व्यसनमुक्ती निवासी शिबिर' आयोजित करण्यात आले असून उदघाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुणे मनपा नगरसेविका निताताई दांगट, सरपंच गोकुळ करंजावणे, लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम चे अध्यक्ष महेश गायकवाड, गणेश आणेराव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषबाप्पू हगवणे, डॉ भांडवलकर, डॉ कांबळे, रमेश करंजावणे, डॉ. सुजाता गायकवाड, प्रमोद बाराहाते, आनंतदादा दांगट, भाऊसाहेब हगवणे, राजेंद्र करंजावणे, नरेंद्र हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यसनाधीन व्यक्ती व त्याच्या कुटुंबाकडे समाज वेगळ्या तिरसट नजरेने पाहतो याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक स्वास्थ्यावर होऊन मानसिक आघात होतो ,हे आघात कुणीही भरून काढू शकत नाही असे काकासाहेब चव्हाण यांनी नमूद केले आणि अशा कुटुंबाना आधार देणे समाजाचे काम आहे असे ही त्यांनी आवाहन केले.
यावेळी बोलताना नगरसेविका निताताई दांगट यांनी सदरचा उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद करून व्यसन हा मानसिक आजार असून त्याचा स्वीकार केल्यास त्याचे नक्कीच निर्मूलन होईल असे सांगितले. तर लायन्स क्लब चे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, व्यसनाधीन व्यक्तीने मनात न्यूनगंड न ठेवता मन खंभीर ठेऊन यातून आपल्या स्वतःला व्यसनमुक्त केले पाहिजे. व्यसनाधीनतेमुळे त्या व्यक्तीच्या सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम हा अतिशय भयानक असून तो कधी ही पुसला जात नाही. त्यामुळे समाजाने देखील अशा लोकांना नावे न ठेवता मुख्य प्रवाहात कसे येतील हा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी डॉ अनिल भांडवलकर, डॉ सुजाता गायकवाड, रमेश करांजावणे, प्रमोद बाराहाते, सुभाष हगवणे तसेच मीनाक्षी सुतार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर स्वागतपर प्रस्ताविक मध्ये संस्थेचे अध्यक्ष सुभाष हगवणे यांनी त्यांचा स्वानुभव सांगत संस्था सुरु करण्याचे प्रयोजन सांगितले व संस्था ही सामाजिक बांधिलकी भावनेतून चालू असल्याचे नमूद केले. यावेळी या शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्याचा सन्मान करण्यात आला.शेवटी माजी उपसरपंच नरेंद्र हगवणे यांनी आभार मानले.