पुणे: मुंबईतील १०० कोटी वसूली प्रकरण जोरदार गाजले असतानाच दुसरीकडे पुण्यामध्ये असाच प्रकार दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या उपायुक्त माधव जगताप यांनी प्रशासनाला दिवसाला १० लाख रुपये वसूल करून देण्याचा आदेश दिला आहे. सोशल डिस्टन्स न पाळणारे, मास्क न वापर करणार्यांवर कारवाई करा. रोज १० लाखाचा दंड (१००००००) वसूल असा आदेशच उपायुक्तांनी काढला असल्याने गोरगरिबांना जगण्याची भ्रांत असताना दैनंदिन १० लाख रुपयांचा दंड सक्तवसुलीचे आदेश काढणे कितपत योग्य आहे, असा सवाल पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने मास्क न लावणे, सोशल डिस्टंसींग न पाळणे व कारवाई करून सील केलेल्या आस्थापना इत्यादीबाबत दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे कारवाई करण्यात यावी आणि मनपा कार्यक्षेत्रात एकून १० लाख दंड वसूलीचे उदीष्ट प्रति दिनी अपेक्षीत आहे. वसूली बाबतचा दैनंदिन अहवाल रोजचे रोज आपत्ती व्यवस्थापन मनपा या व्हॉट्स अप ग्रुपवर न चुकता पाठविण्यात यावा. वसूलीचे उदिष्ट पुर्ण करणे व अहवाल सादर करणे याबाबत कसूर केल्यास कडक कार्यवाई करण्यात येईल, असेही त्यांनी आदेशामध्ये म्हटले आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असेल तर मिळकतकर वसूल करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच ज्या मिळकतीवर टॅक्स लावला नाही, त्या शोधून टॅक्स लावला पाहिजे. खर्चात बचत म्हणजे देखील उत्पन्न असते. कोट्यवधीचे टेंडर रिंग न करता कसे होतील यावर जरी भर दिला तरी करोडो रुपये वाचणार आहेत. पण सत्ताधारी यांच्या दबावाने मोठे घोटाळे करायचे आणि मग गोरगरिबांना नाहक त्रास द्यायचा असला तुघलकी कारभार बंद करा. अन्यथा पुणेकर येत्या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवतील, असा इशारा विरोधी पक्ष नेत्या धुमाळ यांनी दिला आहे.