पुणे: कोरोना महामारीचे निर्बंध शिथिल झाले आहेत. मात्र, तब्बल १६ महिन्याच्या कालावधीनंतर पुणे जिल्हा परिषदेची मुख्यसभा ऑफलाईन पद्धतीने झाली. मात्र पुणे महानगर पालिकेची मुख्यसभा ऑनलाईन पद्धतीनेच होत आहे. ऑनलाईन सभेमध्ये सत्ताधारी आम्हाला बोलूच देत नसल्याचे गाऱ्हाणे नगरसेवकांनी मांडल्यानंतर हे निर्बंध हटविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांना दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसातच याबाबत आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे घेतलेल्या बैठक घेण्यात आली. या वेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना चांगलेच धरेवर धरले. त्यामध्ये शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर चुकीचे काम होत असताना तुम्ही विरोध का करत नाहीत, असा प्रश्न पवार यांनी केला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची मुख्यसभा ही ऑनलाइन होत आहे, नगरसेवकांना बोलू दिले जात नाही, सत्ताधाऱ्यांकडून आमचे माईक बंद केले जातात, अशी तक्रारींचा सूर नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लावला.
तात्काळ विषय मार्गी लावणाऱ्या अजित पवारांनी यांनी थेट नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांना फोन करून याबद्दलची चौकशी केली. त्यावेळी पाठक यांनी हा प्रस्ताव तयार असून, तो येत्या आठवड्यात याबाबत आदेश काढले जातील, असे सांगण्यात आले. त्यामुळे एका आठवड्यात हा आदेश निघाल्यास आगामी मुख्यसभेत विषय आक्रमकपणे मांडणार तसेच चुकीच्या मुद्यांवर आवाज उठवणार, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.