पुणे: राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर कोरोना महामारीमुळे लागलेल्या निर्बंधामुळे मागील सुमारे सोळा महिन्यांपासून पुणे जिल्हा परिषदेचे व पंचायत समित्यांचे सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरु होते. निर्बंध शिथिल झाल्यामुळे तब्बल १६ महिन्यांच्या काळानंतर पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज ऑफलाईन पद्धतीने पार पडले. हवेली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाल्याने हवेली पंचायत समितीचे कामकाज आणि कर्तव्य पार पडण्याच्या दृष्टीने हवेली पंचायत समितीच्या सभापती निवड करण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ७५ अन्वये जिल्हा परिषदेकडील विषय समित्याचे सभापती यांच्या मधून एका सभापतींची हवेली पंचायत समितीच्या सभापती पदी चिठ्या टाकून निवड करण्यात आली. यात महिला व बालकल्याण समितीच्या पूजा पारगे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने, निवडणूक निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभापती पदी पूजा पारगे यांची निवड झाल्याची घोषणा केली.
"कालच मी सभापती पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे, मिळालेल्या निधीचा तात्काळ वापर हवेली तालुक्यासाठी केला जाईल, प्रामुख्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यात कचरा मुक्त गाव अभिअयान राबवाले जाणार आहे. यासाठी गावो गावी शोष खड्डे तसेच कचरा प्रकल्पाच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे. हे अभियान व्यापक स्तरावर नेण्यासाठी आम्ही लोकसहभागातून प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच कचरामुक्त गाव अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाईल" महिला व बालकल्याण समिती, सभापती - पुजा पारगे
यानुसार महिला व बालकल्याण समितीच्या पूजा पारगे यांच्यावर हवेली पंचायत समितीच्या सभापती पदाचा अतिरिक्त भार पडला आहे. नवीन सभापतींची निवड होण्यापर्यंत सभापतीचे कामकाज व कर्तव्य पार पडण्याची पूजा पारगे यांच्याकडे जबाबदारी आली आहे.
हवेली पंचायत समितीचे एकवीस सदस्य असुन, सध्या अकरा सदस्यासह पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुर्णपणे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेही सहा पंचायत समिती सदस्य असुन, शिवसेनेचे चार पंचायत सदस्य आहेत.