वेल्हे: नागरिकांशी थेट संवाद साधता यावा तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी आता पोलिस स्टेशननिहाय तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. यानुसार वेल्हे पोलीस स्टेशन येथेही तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असून, पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीसंबंधित अर्जदार, गैरअर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारींवर त्वरित निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याचा सकारत्मक फायदा होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
जास्तीत जास्त तक्रारदारांनी गुरुवारी उपस्थित राहून आपल्या तक्रारींचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा, असे आवाहन वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले आहे.
अनेकदा नागरिकांकडून येणाऱ्या अर्जावर काहीतरी थातूर मातूर कारवाई करण्यात येत असते. तर, काहीवेळेस यात थोडीफार दिरंगाई होऊ शकते. तक्रारदिनानिमित्त नागरिकांना तक्रारीवर झालेल्या कार्यवाही माहिती दिली जाईल. तसेच नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतील. या कार्यक्रमामुळे नागरिकांचा दृष्टीकोन नक्कीच बदलू शकेल. तक्रार निवारण दिनी तक्रार दाखल करण्यासह दाखल तक्रारींच्या कार्यवाहीची माहिती वरिष्ठांकरवी तक्रारदारास दिली जाणार आहे. समोर आलेल्या अर्जानुसार तडजोडी आणि समझोता प्रयत्नही होणार आहे. अधिकाधिक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न यादरम्यान केला जाणार आहे.