पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात आले आहे. दुबार नोंदी वगळणे, नावांमध्ये दुरुस्ती करणे, मतदान केंद्रस्थरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करणे, योग्य प्रकारे विभाग किंवा भाग तयार करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करणे ही कामे केली जात आहेत. १ जानेवारी २०२२ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांचे अर्ज मतदार म्हणून स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे या नवमतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे
पुणे महानगर पालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांमुळे महापालिकेचा विस्तार झाल्याने या भागातील मतदारांची नोंदणी केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. या मोहिमेंतर्गत १ जानेवारी २०२२ रोजीपर्यंत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदारांची संख्या ७८ लाख ८७ हजार ८७४ झाली आहे. त्यामध्ये शहरातील आठ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदारांची संख्या ३१ लाख ३८ हजारांपर्यंत पोहोचली आहे.
पुण्यातील ८ मतदार संघातील मतदार संख्या
हडपसर मतदारसंघ - ५,९९,७१७
खडकवासला मतदार संघ -४,९५,९७६
कोथरूड मतदार संघ - ४,६१,३९८
वडगाव शेरी मतदार संघ - ४,१३,९७६
पर्वती मतदार संघ - ३,५४,४७१
शिवाजीनगर मतदार संघ - ३,०६,४२०
कसबा मतदार संघ - २, ९३,२२४
पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ- २,९३९०९
ही यादी पुन्हा अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट २३ गावांमधील मतदार असतील, असेही निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.