राजा माने
मुंबई: साधारण एकवीस वर्षापूर्वीची सोलापुरातील घटना...जुळे सोलापूरतील एका हॉस्पिटलमध्ये मी आता वाचणार नाही अशा अवस्थेत माझी आई अक्का, पत्नी सौ. मंदा आणि माझे जीवलग सहकारी, माणसपुत्रच म्हणा संतोष शिंदे, वशिष्ठ घोडके, सचिन वायकुळे यांनी दाखल केलेलं... डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं... "माणूस वाचणं शक्य वाटंत नाही... देवावर भरवसा ठेवा ! पुढच्या आठ-दहा तासात काय होईल हे सांगू शकत नाही..!"..हे शब्द कानावर पडताच अक्का चवताळूनच त्या माझ्या डॉक्टर मित्राला म्हणाली.." तुम्ही तुमचं औषधपाणी करा..माझा राजा मरत नसतो!"... परिस्थिती आणि मेडिकल सायन्स मी मरणार असा कौल देत होते.माझी अक्का आणि बायको सौ.मंदा यांची श्रध्दाशक्ती व मन मात्र त्या कौलावर तुटून पडले होते.. डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न चालूच ठेवले... काही तास लोटले... अक्का व सौ.मंदाची श्रद्धा जिंकली!.. डॉक्टरही मिरॅकल.. मिरॅकल म्हणत आनंदाने धोका कळल्याचे सांगू लागले..माझा दुसरा जन्म झाला.
कोणतीही आई आपल्या बाळाला एकदाच जन्म देते... माझ्या अक्काने माझ्या आयुष्यात सावली सारखे सोबत अनेकदा मला "नवा जन्म" दिला! वरील घटनेनंतर अक्काने दिलेल्या नव्या जन्मानंतर माझ्या नव्या ईनिंगला मी दमदार सुरुवात केली. अक्काने रोजगार हमीवर काम करंत, धुणं भांडी करत बापूच्या साथीनं आम्हा तीन भावंडांना वाढवलं... मी राजेंद्र ज्ञानदेव माने पण लहानपणापासूनच अक्कने मला "राजा माने" या बिरुदाच्या प्रेमात पाडले! त्या बिरुदासाठी पेटून उठविले. तोच झंझावात माझ्या जीवनाचे बलस्थान आहे... आज मात्र माझी स्वतःचीच सावली हरवून बसल्याने कमालीची बेचैनी आहे... माझी आई... आपली अक्का... गेल्या पन्नास वर्षांत माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सहवास-संपर्कात जे जे आले, त्यांच्या साठी ती " आपली अक्का" कधी झाली, हे त्यांनाही कळले नसेल...प्रेमळ, जिद्दी,हळवी,कष्टाळू , धाडसी, संकटांना नजुमानणारी, बेस्ट डिसिजन मेकर आणि जिव्हाळ्यानं माणसं जोडून ठेवणारी... आपली अक्का... तिला देवाघरी जावून बघता बघता वर्ष लोटले.. आपल्या लेकरांसंदर्भात सोशिकता आणि त्याग ही आद्यकर्तव्य देवूनच परमेश्वराने आई हे पात्र बनविले असावे! त्यामुळेच तर आई महालातील असो वा झोपडीतील, आई अमेरिकेतील असो वा भारतातील, अर्थात जगाच्या पाठीवरील आई कुठलीही असो ती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराने दिलेल्या त्या आद्यकर्तव्याचे पालन करतेच. आपल्या लेकरांसाठी स्वतः चा जीव झिजवतेच!
अक्काने आयुष्यभर ते तर केलेच पण ते करताना चांगुलपण, माणुसकी, आत्मसन्मान आणि मोठं काम उभं करण्यासाठी सतत धडपडण्याची जिद्द आमच्यात ठासून रुजविली. पोटात अन्नाचा कण नसला तरी कल्पनादारिद्र्य कधी आसपासही फिरकू दिलं नाही! अक्काला आमच्या कडून जे अपेक्षित होतं, आजवरच्या जीवनात त्यातलं आम्ही थोडंबहुत केलं.. अजून खूप काही करायचे बाकी आहे. अक्का नसल्याच्या वास्तवाने मानगुटीवर बसलेली बेचैनी व अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही... अक्काने जे दिलं त्याचं सोनं करीत राहणं, एवढंच आपल्या हाती आहे. ते करण्याचं बळ आम्हाला सदैव मिळत राहो, हीच श्री.भगवंत चरणी प्रार्थना!