पुणे: पुणे बंगलोर हायवेवर नवले ब्रिज परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या या ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. शम्स महम्मद अली झवेरी (वय ६०, रा. काशीमिरा रोड, ईस्ट मुंबई) असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून ६ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिंहगड रोडवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पेट्रोलिंग करत असताना नवले पुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील चैतन्य बिअर शॉपी समोर एका जण कारसह संशयितरित्या थांबला असल्याचे या पथकाला आढळून आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३ लाख रुपयांचं २० ग्रॅम मेफेड्रॉन (एम डी), दोन मोबाईल, रोख रक्कम आणि कार असा ६ लाख २३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
झवेरी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे अधिक तपास करीत आहेत.