पुणे: कोरोनामुळे नागरिकांनी विसर्जन घाटावर, विसर्जन हौदावर दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गर्दी करू नये तसेच २४८ ठिकाणी मूर्ती संकलन केले जाईल यासाठी मोठा गाजावाजा करत महापालिकेने गणपती विसर्जनासाठी विसर्जन हौद असतील अशी घोषणा केली होती. दीड दिवस होऊन गेली तरी फिरत्या विसर्जन हौदाच्या गाड्यांवर बॅनर लावले नसल्याने या गाड्या मार्गस्थ झाल्या नाहीत. पावसात गाड्या भिजल्याने त्यावर सजावटीचा बॅनर चिटकत नसल्याने दुपारपर्यंत गाड्या कात्रज तलाव येथे अडकून पडल्या. त्यामुळे दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जनासाठी नागरिकांना त्रासाला सोमोरे जावे लागले.
महापालिकेचे फिरते विसर्जन हौद न आल्याने मुर्ती संकलन कुठे केले जाणार याची माहितीच नागरिकांना नसल्याने विसर्जन घाटावर गर्दी झाली होती. फिरते हौद कुठेच दिसत नसल्याने व मूर्ती संकलन कुठे केले जाणार याची माहिती नसल्याने नागरिकांची अडचण झाली. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या भागात फिरून महापालिकेने सुविधा कुठे उपलब्ध केली आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कुठेच फिरता हौद व मूर्ती संकलन केंद्र दिसले नाही.