मारुती गायकवाड
असमानी संकट की मानवनिर्मित आपत्ती
अलीकडच्या काळात आपण पाहतोय, निसर्गाने कुठलेही क्षेत्र सोडलेलं नाही. धो धो पाऊस पडतोय आणि शेती-वाडी,घर-दार , गुर- ढोर नि माणसं बरोबर घेऊन वाट मिळेल त्या दिशेने सैरभैर पळतोय तो 'जलप्रवाह'. अगदी ज्या रस्त्याने पायी चाललं जात, गाड्या-घोड्या धावतात त्या रस्त्यावर होड्या व बोटी चालवून जीव वाचवावे लागत आहेत.झुग-झुग करत धावणाऱ्या आगीनगाडीच्या रुळावरून पाणी संथपणे गाणे गात आहे तर हवेत उड्डाण करण्याआधी ज्या धावपट्टी वरून 'उडन खटोला' गगनात झेपावतो त्याठिकाणी पाण्याने आपलं अंथरूण हातारले आहे. नद्या, ओढे, नाले हे दुथडी भरून वाहातायेत तेसुद्धा आजूबाजूच्या अतिक्रमित शेजाऱ्यांना बरोबर घेत.कुठं डोंगर कोसळतोय नी गावच्या गावं गडप होतायेत. तर कुठं वीज पडतेय नी मुक्या जनावरांसह बिचारा बळीराजा - शेतकरी जीवाला मुकतोय.तर कुठं लोकवस्ती मध्ये येऊन बिबट्या सारखे जंगली प्राणी हे कुत्री, शेळी ,गाय-म्हैस सारख्या पाळीव प्राण्याचा जीव घेतायत.असे एक नाही तर अनेक आपत्ती आपल्या भोवताली घडत आहेत.
सर्वात मोठी आपत्ती आपण सर्वजण गेल्या दीड-दोन वर्षांपासून अनुभवतो आहे ती विश्वव्यापी अशी भयानक - "कोरोना महामारी". यामुळे अनेक कुटुंब गारद झाली तर परिवार उध्वस्त झाले. धडधाकट माणसं की जी सकाळी चांगली बोलत होती ,त्यांची संध्याकाळी बातमी येते की ती आपल्यात नाहीत,अंत्यविधी तर सोडाच अंत्यदर्शन ही घेता येत नाही.पुढची विधी- कार्ये तर नावालाच.अनेक निष्पाप बालकांचे मायेचे छत्र हरपले तर अनेक माता-भगिनींचा कुंकवाचा धनी कायमच्या विनापरतीच्या प्रवासाला निघून गेला.किती आघात झाले ? किती सहन करायचे? एकाच वेळी आर्थिक , मानसिक व भावनिक संकटांना सामोरे जावे लागले व लागत आहे.सर्व व्यवहार व नित्यक्रम विस्कळीत झाले आहेत.या सर्व भीतीने अनेकांनी आपली पूर्ण कुटुंबासह जीवनयात्रा संपवली अशा बातम्या आपल्याला टीव्ही व वर्तमानपत्रातून समजल्या. किती भयानक आहे हे ? नुसता विचार केला तरी अंगावर शहारे येतात, भीतीने घाम फुटतो, मात्र हे प्रत्यक्ष घडले आहे हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. असे प्रसंग आपल्या अवती-भोवती घडलेले आहेत ,हे प्रसंग कुणाचे कुटुंब, परिवार, सहकारी, बांधव, नातेवाईक, सगे-सोयरे, मित्र-मंडळी यांच्याबरोबर घडलेले आहेत, कुणी असेल मग ते ज्ञात असो वा अज्ञात असो ते आपले मानव व प्राणी जातीतलेच आहेत,याचे प्रत्येकाने भान ठेवलेच पाहिजे .आज दुसऱ्यावर ही वेळ आली आहे उद्या आपल्यावर देखील येऊ शकते.
हे सर्व घडत असताना, आपण म्हणजे 'मनुष्यप्राणी' की ज्याला आणि फक्त त्यालाच 'विचार करण्याची' शक्ती देणगी रूपाने, या निसर्गाने म्हणा किंवा देवाने म्हणा दिली आहे तो अतिहुशार, बुद्धिमान असलेला मनुष्यप्राणी या संकटासमोर हतबल होतो आहे, ठीक आहे यावर देखील तो उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो, मात्र उपाय अस्तित्वात येई पर्यंत बरीच हानी झालेली असते.त्यात जीवित आणि वित्त आशा दोन्ही हानीचा समावेश होतो. हे सर्व करत असताना मनुष्य मात्र भौतिक सुखाचाच विचार मोठ्या प्रमाणावर करताना दिसतो. हे का घडत आहे याच्या मुळाशी जाऊन अभ्यास करून ते पुन्हा घडू नये यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.मनुष्य वेगवेगळे शोध लावण्याच्या नादात त्याचे होणारे दुष्परिणाम याकडे दुर्लक्ष करतोय आणि नंतर मात्र आक्रीत समोर येऊन ठाकतय.शाश्वत विकास आणि प्रगतीचा ध्यास असावा परंतु त्याचे दुसऱ्या बाजूने काय विपरीत परिणाम होउ शकतात त्याचा ही अभ्यास करणे आवश्यक आहे.आज जे काही घडतंय ,जी वेगवेगळी नैसर्गिक संकटांना सामोरे जावं लागत आहे ,त्याला कोण कारणीभूत आहे? हे सर्वांना माहीत आहे.नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण निसर्गाला दोष देतो आणि त्याच्या नावाने खडे फोडतो. प्रत्यक्षात ही आपत्ती तर " मानवनिर्मित" असते हे मान्य करायला हवेच.
निसर्ग आपलं काम योग्यप्रकारे करत आहे. जोरात पर्जन्यवृष्टी होते,पाणी जमिनीवरून वाहू लागतं, पूर्वीचे नदी-नाले, ओढे यांच्यावर मानवाने अतिक्रमणे केल्याने त्याचे पात्र बदलले आहे. पात्र अरुंद झाल्याने तसेच नैसर्गिक मार्ग अडवल्याने पाण्याचा प्रवाह वाट मिळेल त्या दिशेने मार्गक्रमण करतो, मग तो लोकवस्ती बघत नाही की शेती .तसाच प्रकार आहे नागरी भागात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी हुशार मनुष्य प्राण्याने सोयच केलेली आढळत नाही, बघावे तिकडे सिमेंटचे रस्ते मग पाणी मुरणार कुठे? रस्त्याच्या दुतर्फा गटारे नाहीत ,जिथे आहेत ती 'चोकउप'…