पुणे: कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार आणि भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखीही बांधली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवारवाड्याच्या जिर्णोद्धारासाठी निधी, आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसंच कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे.
अलौकिक, अद्वितीय व्यक्तिमत्वाची अविस्मरणीय भेट 🙏🙏
— Medha Kulkarni (@Medha_kulkarni) September 3, 2021
पंतप्रधान निवासस्थान ७ लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे.@narendramodi pic.twitter.com/1wjYqDWNPH
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी 5 लाख ₹ अथवा दरमहा 5000 ₹ वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी माननीय पंतप्रधानांकडे केली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, असं ट्वीट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.
आपल्या दिल्ली दौऱ्यात मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री (राज्य) डॉक्टर भागवत कराड यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. रुपी बँक संघटनेचे पत्र त्यांना देऊन लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी या विषयात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती त्यांनी दिलीय.
२०१९ विधानसभा निवडणुकीला मेधा कुलकर्णी यांना भाजपने तिकीट नाकारले होते. त्यांच्या जागी कोथरुडमधून चंद्रकांत पाटीलांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी उघड उघड पक्षाबद्दल ची नाराजी बोलून दाखवली होती. नंतर त्यांना भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पदी निवड करून त्यांची नाराजी दूर केली. मागच्या महिन्यामध्ये भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीला गेल्यानंतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कारण देत भेटीसाठी वेळ दिला नव्हता. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रासाठी काही वेगळं धोरण आखात आहे पाहण्याचे औसुक्यचे ठरणार आहे.