पुण्यात उद्यापासून गणेशोत्सवाच्या काळात जमावबंदीचा आदेश, उल्लंघन केल्यास कारवाई

पुण्यात उद्यापासून गणेशोत्सवाच्या काळात जमावबंदीचा आदेश, उल्लंघन केल्यास कारवाई


पुणे: कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून १० तारखेपासून  जमावबंदीचा आदेश लागू असेल, तर १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत कलम १४४ लागू करण्यात येईल. दरम्यान, याबाबतचे आदेश नुकतेच पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी जारी केले आहेत.



कोरोना महामारीला रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास, तसेच संचार करण्यास मनाईचे आदेशही लागू केले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.


पोलिसांकडून पुण्यात गणेशोत्सवासाठी यापूर्वीच आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, 700 अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल. गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत यासाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील. उत्सव कालावधीतील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाईल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.