डोणजे: मागच्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी किल्ले सिंहगड विकास आराखड्याविषयी चाचपणी करून या प्रोजेक्टला तत्वतः हिरवा कंदिल दिला.त्यावेळी सिंहगड परिसरातील वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करावा. वाहनतळावर वाहनचालकांसाठी देखील सुविधा असावी. तसेच पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावं. पर्यटकांना पिठलं-भाकरीसारखे स्थानिक पदार्थ उपलब्ध करून द्यावेत. हे सिंहगड परिसराचा विकास करताना सिंहगड किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. अश्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांना रोजगार व परिसराचा विकास या बाबींवर भर देणारे मा. जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांनी या कामी स्थानिक सहकाऱ्यांसमवेत कामाला सुरुवात केली आहे.
अजितदादा पवार यांनी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेतही मार्गदर्शन करण्यासाठी गाईड असावेत या विधानावर काम करत काल घेरा सिंहगड परिसरातील किल्ल्यावर गाईड म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांची नावे व माहिती याची यादी नवनाथदादा यांनी तयार करून घेतली. प्रसंगी यांच्यासह इतिहास तज्ज्ञ नंदकिशोर मते, वन अधिकारी लवटे साहेब, वन संरक्षण समिती व संपूर्ण घेऱ्यातील सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामी २४ तरुणांनी आपला सहभाग नोंदवला असून, ते गडावर गाईडचे काम करण्यासाठी इच्छुक आहेत. यासोबत डोणजे फाटा, ते सिंहगड माथा या मार्गावर आपली सेवा देणाऱ्या जीप चालकांनी आपल्या संघटनेच्या वतीने, शासनाच्या या विकास आराखड्यात नमूद केलेल्या इ मोटार व्हेईकल सुविधा पुरवण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आमचा ही या आराखड्यात सहभाग असावा या आशयाचे निवेदन जीप चालक संघटनेच्या वतीने नवनाथदादा पारगे यांना सुपूर्द केले.