...आणि त्यासाठी साकारणार पाण्याखाली राहून गायनाचा अद्भुत असा लाईव्ह सोहळा
पुणे: नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा पवित्र संदेश देत तब्बल १०० दिवस डोळ्याला पट्टी बांधत,१०० पेक्षा जस्ट नेत्रदान जागरूकता मोहिमा राबवत अनेक वेगवेगळे विश्वविक्रम करत ज्यांनी तब्बल ५ वेळा "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये आपल्या अनोख्या विक्रमांची नोंद केली असे गायक "विराग मधुमालती" आता अवयवदानाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत ठळकपणे पोहचावा यासाठी चक्क पाण्याखाली राहून सुरमधुर गाण्यांची (underwater singing) माळ गुंफणार आहेत. हा अद्भुत असा सोहळा भारतात नव्हे तर जगभरात पहिल्यांदाच होत असून हा कार्यक्रम घडवून आणणे देखील तितकंच आव्हानात्मक ठरणार आहे. कोरोना निर्बंधाच्या या काळात हा कार्यक्रम आपल्याला प्रत्यक्षात बघता येणं जरी अवघड असलं तरी यावर आयोजकांनी तोडगा काढला आहे... हा कार्यक्रम पूर्णतः "ऑनलाईन" म्हणजेच "व्हर्चुअल इव्हेन्ट" होणार असून घरबसल्या संपूर्ण परिवारासमवेत आपल्याला या अद्भुत कार्यक्रमाचे साक्षीदार होणे शक्य होणार आहे.
सदर कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम तसेच कॉमेडी किंग सुनील पाल यांचा स्टेज परफॉर्मन्स देखील होणार आहे. संगीताच्या या अनोख्या कार्यक्रमात विराग यांच्या आरोग्याला धोका असून देखील त्यांनी फक्त अवयवदानाचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे या एकाच उद्देशाने ही जोखीम उचलली आहे. आपल्या छातीवर ६० किलो वजन चढवून पाण्याखाली जाणे, पाण्यात गाणे गाताना छातीवरील वजनासहित ताल व सुरानुसार श्वासाचा समतोल राखणे, पाण्यामध्ये मुक्त वावर असलेल्या माश्यांमुळे विचलित न होता सुमधुर गीतांचा परफॉर्मन्स देणे, १-२ मिनिटं नाही तर तब्बल एक तास सतत गाण्याचा आविष्कार अशा बऱ्याच जोखिमा घेत साकारण्यासाठी विराग सज्ज होत आहेत. हा सोहळा २० नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडणार आहे.
अवयवदानाचे महत्व पटवून देणाऱ्या या कार्यक्रमाच्या जोरावर विराग मधुमालती आणखी एक नवा आविष्कार "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद करण्यासाठी रचणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल १७ लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा २ लाख पानांचा आणि चक्क ४० फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ "संगीत का महासागर" या नावाने निर्मित केला जाणार आहे. अशाप्रकारचा ४० फुट उंच म्हणजेच एकंदरीत ४ मजली इमारतीच्या उंचीचा हा संगीतग्रंथ जगात एकमेव असणार यात निश्चितच काही शंका नाही.
"संगीत का महासागर" या ग्रंथातील सर्व १७ लाख संगीत अलंकाराचा मजकुर लिहून झाला असून त्याबद्दलची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे, सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा, सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, विनोदवीर सुनील पाल यांनी या ग्रंथासोबतच या आविष्काराचे जनक विराग यांचे मनभरून कौतुक केले आहे.
विश्वविक्रम करण्यात ज्यांचा हातखंडा आहे असे विराग मधुमालती यांनी त्यांच्या या नव्या विश्वविक्रमासाठी सन १९९६ पासून रियाझ आणि अलंकारांच्या निर्मितीसाठी अभ्यास करत आहे. कलेचे जाणकार विराग मधुमालती यांनी गेली २५ वर्ष कलेसाठी अर्पित केली आहेत आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीचे यश म्हणजेच हा संगीतग्रंथ आहे असे ते सांगतात