व्हायरल व्हिडीओनंतर पुणे महापालिकेची सगळीकडून थट्टा, पाण्यावर डांबर टाकून रस्ता बनविण्याचा अजब घाट

व्हायरल व्हिडीओनंतर पुणे महापालिकेची सगळीकडून थट्टा, पाण्यावर डांबर टाकून रस्ता बनविण्याचा अजब घाट


वारजे: रस्त्यावर पावसामुळे तुंबलेल्या पाण्यावर डांबर टाकून रस्ता बनविण्याचा अजब घाट पुणे महापालिकेने केला आहे. डांबर आणि पाणी कधीही मिक्स होत नाही हे विज्ञान सांगते. मग हा रास्ता कसा बनणार? वारजे माळवाडीत महापालिका कर्मचाऱ्यांनी चक्क रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात डांबर टाकलं. हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर पुणे महापालिकेची सगळीकडून थट्टा सुरु झाली आहे. संबंधित व्हिडीओ हा पुण्यातील वारजे माळवाडी भागातील आहे. वारजे माळवाडी परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. तिथे रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात डांबर ओतल्याचं संबंधित व्हिडीओत दिसत आहे. जर पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात डांबर टाकून रस्त्याचं काम होत असेल तर मग कुठल्या दर्जाचं असेल, असे सवाल उपस्थित करुन पुणेकर कामाच्या दर्जावरुन टीका करत आहेत.



रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असूनही पालिका कर्मचाऱ्यांनी भर पाण्यात डांबर टाकलं. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न  करता चक्क साचलेल्या पाण्यात डांबर ओतलं. रस्त्याचं काम करताना या या व्हिडीओत 7 ते 8 कर्मचारी दिसून येत आहेत. जयंतकुमार सोनवणे यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.तुंबलेल्या पाण्यावर डांबर टाकून रस्ता बनवण्याचं तंत्र विकसित केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालंच पाहिजे, अशी उपरोधिक फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.