औरंगाबाद: बी.ई. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या बायकोला नोकरी लावण्यासाठी सासऱ्याकडून दहा लाख घेतल्यानंतर पत्नीला बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या नवऱ्यासह सासरच्या मंडळीविरुद्ध औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालनामध्ये राहणाऱ्या पती रोहित जगन्नाथ पोतराजे सोबत आणखी ४ जणांविरुद्ध पीडित विवाहितेने तक्रार दिली होती. रोहित पोतराजे आणि विवाहितेचे ५ मे रोजी लग्न झाले होते. विवाहिता ही बी.ई. सिव्हिल इंजिनीअर असल्याने लग्नापूर्वी अंबड एका कॉलेजमध्ये तासिका तत्त्वावर नोकरी करीत होती.
आरोपींकडून लग्नाचा प्रस्ताव आला, तेव्हा आरोपींनी मुलीला नोकरी लावून देण्याची अट घातली. मुलीच्या वडिलांनी नोकरी लावणे शक्य नसल्याचे सांगितले, तेव्हा आरोपींनी १० लाख रुपये दिल्यास दिव्याला नोकरी लावतो, असे सांगितले. यानंतर विवाह पार पडला. काही दिवसांनंतर दिव्याच्या वडिलांनी दोन टप्प्यांत आरोपींना दहा लाख रुपये दिले. त्यानंतर पतीने दिव्याला नोकरीचे नियुक्तिपत्र दिले. हे नियुक्तिपत्र त्यांनी तपासले असता, ते बनावट असल्याचे समजले. दिव्याने पतीला जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. शिवाय सासू, सासरे, अन्य आरोपींनी हे कुणालाही बोलू नको, म्हणून तिला दम दिला. याप्रकरणी आता औरंगाबाद जिन्सी पोलीस तपास करीत आहेत.